S Jaishankar Iran Foreign Minister Phone Call: “व्यावसायिक जहाजं आणि खलाशांवर हल्ले करु नका”, अशी सक्त ताकीद देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करताना दिली. एस. जयशंकर यांनी पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाबद्दल तीव्र चिंता देखील व्यक्त केली.

एस. जयशंकर आणि अब्बास अराघची यांच्यात काय चर्चा झाली?

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अराघची यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेची माहिती ‘एक्स’ या सोशल मीडियावरुन दिली आहे.
“आज सायंकाळी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी फोनवर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान भागात सुरू असलेल्या संघर्षाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली,” असे जयशंकर यांनी म्हटले आहे. “कोणत्याही परिस्थितीत व्यावसायिक जहाजं आणि खलाशांवर हल्ले टाळावेत अशी आमची विनंती आहे. भारत अशा प्रकारच्या हल्ल्यांचा निषेध करतो”, असे जयशंकर यांनी पुढे म्हटले आहे.

कराराच्या वाटाघाटीबद्दलही चर्चा

अब्बास अराघची यांच्याशी झालेल्या चर्चेत सध्या सुरू असलेल्या कराराच्या वाटाघाटींची माहिती देण्यात आल्याचेही एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. “भारत नेहमीच संवाद आणि राजनैतिक मार्गांचे समर्थन करतो,” असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, एव्हियन येथील जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी खलाशांच्या सुरक्षेवर विशेष भर दिला होता.

पंतप्रधान मोदींनीही यापूर्वी केला होता उल्लेख

“हॉर्मुजच्या सामुद्रधुनीमधील अडथळ्यांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अनेक भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. खलाशांची सुरक्षा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण तेच सर्व देशांना जोडतात. जलमार्ग सुरक्षित राहतील आणि खलाशांना कोणतीही भीती न बाळगता आपले काम करता येईल, याची काळजी आपण घ्यायला हवी,” असे पंतप्रधान मोदींनी म्हटले होते.