नेपाळमधील महाप्रलयात तब्बल ५३८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो नागरिक बेपत्ता झाले आहेत. या महापुराच्या घटनेनंतर अनेक गावं भुईसपाट झाले आहेत, तर अनेक गावांचा अद्यापही संपर्क तुटलेलाच आहे. या महापुरात शेकडो भारतीय देखील बेपत्ता झाले आहेत. सध्या नेपाळच्या सैन्यांकडून आणि पोलिसांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आलेलं आहे.
नेपाळमधील महापुरानंतर जवळपास ३२० भारतीय अद्यापही बेपत्ता आहेत, तर ४०० जण सुरक्षित असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी दिली. पुराचा फटका बसलेल्या शेकडो भारतीय नागरिकांना पुन्हा भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.
नेपाळमधील पुरामुळे बाधित झालेल्या भारतीयांपैकी २१ जण विमानाने शुक्रवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. पूरस्थितीतून सुखरूप परतलेले हे २१ जण तमिळनाडूमधील आहेत. या २१ यात्रेकरूंची परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी शुक्रवारी दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यानचे फोटो मंत्री एस.जयशंकर यांनी एक्सवर (ट्विटर) शेअर केले आहेत. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
मंत्री एस.जयशंकर यांनी काय म्हटलं?
“नेपाळमधील पूरपरिस्थितीतून सुखरूप पुन्हा भारतात परतलेल्या तमिळनाडूमधील २१ पर्यटकांचं मी स्वागत केलं आहे. नेपाळमधील पूरपरिस्थितीचा त्यांचा प्रत्यक्ष अनुभव ऐकून माझं मन हेलावून गेलं. पण ही बचाव मोहीम यशस्वीपणे राबवल्याबद्दल नेपाळचं लष्कर आणि तेथील सरकारचे आभार मानतो. तसेच, या पर्यटकांच्या भारतात सुखरूप परतण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावण्यामध्ये नेपाळमधील भारतीय दूतावासाच्या प्रयत्नांचंही मी कौतुक करतो”, असं मंत्री एस.जयशंकर यांनी म्हटलं.
“कैलास मानसरोवर यात्रेला गेलेल्या भारतीयांच्या एका गटाची मी नुकतीच भेट घेतली. पूरपरिस्थितीनंतर त्यांना पुन्हा सुखरुप भारतात आणण्यात आलं आहे. ते सुखरूप परतल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी मी त्यांना भेटलो. तिथे अडकलेल्या सर्व भारतीयांशी संपर्क साधण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. पण आमच्या माहितीनुसार, ३१५ हून अधिक भारतीयांशी अद्यापही संपर्क होऊ शकलेला नाही. विविध ठिकाणांहून ८५ भारतीयांची सुटका करण्यात आली आहे, यामध्ये नुकत्याच परतलेल्या २१ जणांचाही समावेश आहे”, असं मंत्री एस.जयशंकर यांनी म्हटलं आहे.
३२० भारतीय अद्यापही बेपत्ता
नेपाळमध्ये आलेल्या भीषण महाप्रलयात आत्तापर्यंत तब्बल ५३८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती नेपाळ सरकारकडून देण्यात आली आहे. तसेच ३२० भारतीय अद्यापही बेपत्ता आहेत, तर ४०० जण सुरक्षित असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दिली. तसेच पुराचा फटका बसलेल्या इतर शेकडो लोकांशी संपर्क साधण्यासाठी अद्यापही प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी सांगितली.
नेपाळच्या महाप्रलयात ५३८ जणांचा मृत्यू
नेपाळच्या महाप्रलयात आत्तापर्यंत ५३८ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती नेपाळ सरकारने दिली आहे. तसंच नेपाळ सरकारने असंही सांगितलं आहे की आत्तापर्यंत ११७ पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी ८५ पर्यटक हे भारतीय आहेत. नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे हाहाकार माजला आहे. भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार सातत्याने दोन्ही देशांच्या अधिकार्यांच्या संपर्कात असून पूरग्रस्त भागात अडकलेल्या भारतीयांची स्थिती आणि सुरक्षिततेची माहिती घेण्यात येत आहे.
