नवी दिल्लीत आज (४ ऑक्टोबर) म्युनिक सुरक्षा परिषद पार पडली आहे. या परिषदेमध्ये बोलताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी विविध जागतिक मुद्यांवर भाष्य केलं. तसेच सध्या चीनचं वाढतं वर्चस्व आणि अमेरिकेची बदलती रणनीती व अमेरिका आणि चीन यांच्यातील स्पर्धा यासह आदी मुद्यांवर मंत्री एस.जयशंकर यांनी भूमिका मांडली आहे.

म्युनिक सुरक्षा परिषदेत बोलताना मंत्री एस.जयशंकर यांनी अमेरिका आणि चीनबाबत एक महत्वाचं वक्तव्य केलं. जयशंकर यांनी अमेरिकेचं वर्णन ‘स्वतःच्या इच्छेने एकाकी पडलेली महासत्ता’ असं केलं, तर अमेरिकेची बदललेली भूमिका आणि चीनचं वाढतं वर्चस्व, यामुळे जागतिक परिस्थितीचं स्वरूप बदलत असल्याचं मत जयशंकर यांनी व्यक्त केलं.

“सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती तीन गोष्टींमुळे बदलत आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील स्पर्धा, उदयोन्मुख आणि मध्यम शक्तींची वाढती स्वावलंबनाची भावना आणि भागीदारीत विविधता. जागतिक स्पर्धा आता केवळ अमेरिका आणि चीनपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर अनेक राष्ट्र आपला प्रभाव आणि संसाधने ज्या प्रकारे वापरत आहेत, त्या पद्धतीत या स्पर्धेमुळे बदल झाला आहे”, असं सांगत एस.जयशंकर यांनी जागतिक स्थरावरील बदलत्या समीकरणांवर भाष्य केलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

मंत्री एस.जयशंकर काय म्हणाले?

“आजच्या जागतिक परिस्थितीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेने स्वतःची बदललेली भूमिका. ही फेररचना किंवा हा बदल म्हणजे अमेरिकेने स्वतःहून स्वीकारलेली एक भूमिका आहे. एका अर्थाने अमेरिका स्वतःहून अधिकाधिक एकाकी पडणारा देश बनत चालला आहे. आता दुसरं म्हणजे चीनचा उदय. चीन स्वतःला एक युनिक (Unique) देश मानत चालला आहे. ही केवळ त्यांची स्वतःची धारणा नाही, तर अनेक बाबतीत पाहिलं तर ती वस्तुस्थिती देखील आहे. आपण आता जगात अतिशय तीव्र स्पर्धा पाहत आहोत. ही स्पर्धा आज केवळ या दोन देशांपुरती मर्यादित राहिलेली नाही. यामुळे कोणत्याही देशाकडे असलेल्या प्रभावाच्या साधनांचा वापर एखाद्या शस्त्राप्रमाणे होत आहे”, असं मंत्री एस.जयशंकर यांनी म्हटलं आहे.