भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी न्यूयॉर्कमधील ‘एशिया सोसायटी’च्या एका कार्यक्रमात बोलताना अनेक महत्वाच्या विषयांवर भाष्य केलं आहे. भारत-अमेरिका संबंध, भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराच्या वाटाघाटी, आयात शुल्काबाबतची अनिश्चितता आणि दहशतवादाबाबत भारताच्या चिंता अशा वेगवेगळ्या विषयांवर मंत्री एस.जयशंकर यांनी रोखठोख भूमिका मांडली आहे.
दहशतवादाबाबतच्या भारताच्या चिंतांची पुरेशी समज किंवा जाणीव नसल्यास त्याचा परिणाम भागीदार देशांशी असलेल्या संबंधांवर होऊ शकतो. दहशतवादाबाबतच्या भारताच्या चिंतेबाबत अमेरिकेला समज नाही आणि हा मुद्दा दोन्ही देशांमधील संबंधांवर परिणाम करणारा आहे, असं मोठं वक्तव्य मंत्री एस.जयशंकर यांनी केलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
व्यापार वाटाघाटी अधिक गुंतागुंतीच्या ठरल्या आहेत. अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणातील बदलांमुळे अनिश्चिततेची आणखी एक भर पडली आहे. या संबंधांमध्ये काही चढ-उतार किंवा अडथळे आले आहेत. त्यामुळे प्रामुख्याने या व्यापार वाटाघाटींचा वेग आणि त्यातील गुंतागुंत वाढली आहे, असं एस.जयशंकर यांनी म्हटलं आहे.
‘आज मी एवढंच सांगतो की, व्यापार कराराबाबत बऱ्याच अंशी समझोता झालेला आहे. मात्र, खरा प्रश्न हा आहे की अमेरिकेच्या बाजूने काय बदल झाले आहेत?’, असा सवाल करत एस.जयशंकर यांनी अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणात झालेल्या बदलांकडे लक्ष वेधलं.
“दहशतवाद ही भारतासाठी मुख्य चिंतेची बाब राहिलेली आहे. विशेषतः पाकिस्तानमधून अनेक दशकांपासून होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांचा मुद्दा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्हाला वाटतं की, कदाचित असे खूप कमी देश असतील ज्यांना शेजारी देशाकडून अनेक दशकांपासून जाणीवपूर्वक राबवल्या जाणाऱ्या दहशतवादाचा सामना करावा लागला आहे”, असं एस.जयशंकर यांनी म्हटलं आहे.
“दहशतवादाबाबतच्या भारताच्या चिंतांची पुरेशी समज किंवा जाणीव नसल्यास त्याचा परिणाम भागीदार देशांशी असलेल्या संबंधांवरही होऊ शकतो. कारण जी गोष्ट आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, त्याबद्दल जर पुरेशी सहानुभूती नसेल, तर मला वाटतं की त्यामुळेही संबंधांवर नक्कीच परिणाम होतो”, अशी भूमिका एस.जयशंकर यांनी मांडली आहे. दरम्यान, भारत-अमेरिका संबंधांमध्ये अनिश्चिततेचं वातावरण असताना एस.जयशंकर यांनी ही महत्वाची भूमिका मांडली आहे.
