बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौत आणि रामदेवबाबा यांच्यातला कलगीतुरा अखेर संपुष्टात आला आहे. आजच रामदेवबाबांनी कंगना ही आमची बहीण आहे, मी तिला राखी पौर्णिमेच्या निमित्ताने गिफ्ट पाठवली आहेत असं म्हटलं होतं. ज्यानंतर कंगनानेही रामदेवबाबांना मोठा भाऊ असं संबोधत भेटवस्तूंचा स्वीकार केला आहे. ज्यानंतर या दोघांमध्ये सुरु असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. “सब भूल चूक माफ” असे म्हणत तिने या वादाला पूर्णविराम दिला आहे.
रामदेवबाबा काय म्हणाले होते?
रामदेवबाबा म्हणाले, आमची बहीण कंगना रणौतला आम्ही गिफ्ट आणि मिठाई पोस्टाने पाठवत आहोत. कुठल्याही कारणाने देशात तिरस्कार, वैरभाव कुणाचंही भलं करत नाही. आता लोक म्हणत आहेत की रामदेवबाबा आणि कंगना यांच्यात वाद झाला आहे. पण वाद झाला असेल तर आम्ही तो संवादातून संपवू. आज आम्ही कंगनाला फोन करु आणि राखी पौर्णिमेच्या शुभेच्छाही देऊ. असं विधान करत रामदेवबाबांनी वादावर पडदा टाकला. ज्यानंतर कंगनानेही भेटवस्तू स्वीकारत रामदेवबाबा माझे मोठे भाऊ असल्याचं म्हटलं आहे.
कंगना रणौतने काय म्हटलं आहे?
कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत लिहिले, “रक्षाबंधन सण हा सर्व विसरून माफ करण्यासाठी असतो. माझे मोठे भाऊ रामदेवबाबाजी यांनी खूप छान सांगितले की, वाद नाही तर संवाद व्हायला हवा. आज रक्षाबंधनानिमित्त मी त्यांनी पाठवलेली मिठाई आणि भेटवस्तू स्वीकारते. मोठ्या भावाचे प्रेमही स्वीकारते. तुमचे खूप खूप आभार, ईश्वर तुम्हाला दीर्घायुष्य देवो.” या आशयाची पोस्ट लिहित कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.

नेमकं प्रकरण काय होतं?
भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत आणि योगगुरू बाबा रामदेव यांच्यातील शाब्दिक युद्ध पेटलं होतं. दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलनात सहभागी झालेल्या काही तरुणांच्या भाषेवर आणि वर्तनावर कंगनाने आक्षेप घेतला होता. तिने त्या आंदोलकांना ‘जनरेशन गटर’ म्हटले होते. याबाबत रामदेवबाबांना विचारलं असता ते म्हणाले होते “कंगनाची पात्रता काय आहे? तिचे बालपण कसे गेले? तिचे तरुणपण कसे गेले आहे? तिची पूर्वीची कामगिरी काय आणि कशी राहिली आहे? मला अशा लोकांबद्दल बोलायचे नाही. देशातील अशा कोणत्याही तरुणांना आणि Gen Z ला गटर-पटर बोलणे, हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे, चुकीची गोष्ट आहे. यावर तिच्या पक्षातील लोकांनी दखल घेतली पाहिजे.” यावर कंगनाने पुन्हा उत्तर दिलं होतं.
कंगनाने रामदेवबाबांना उद्देशून काय पोस्ट केली होती?
कंगनाने इन्स्टाग्रामवरुन प्रत्युत्तर दिलं. ती म्हणाली होती, “बाबा जी, माझं तारुण्य किंवा बेडरूमबद्दल दिवास्वप्नं पाहू नका. कोणीही केवळ अफवा आणि गप्पांच्या आधारावरच अंदाज लावू शकते. किमान मला कधीही सर्वोच्च न्यायालयाकडून खोट्या आणि फसव्या वैद्यकीय दाव्यांसाठी फटकारले गेले नाही, जे पक्क्या तथ्यांवर आधारित आहेत, कोणत्याही अंदाजावर नाही. त्यामुळे चारित्र्याबद्दल मला शिकवू नका, तुमच्यापेक्षा माझे चारित्र्य खूप चांगले आहे, माझ्यावर कोणताही फसवणुकीचा आरोप लागलेला नाही.” असं कंगना म्हणाली होती. आज रक्षाबंधनच्या दिवशी दोघांनीही वादावर पडदा टाकला आहे.
