जयपूर : राजस्थानमधील अशोक गेहलोत मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार करण्यात आला. १५ नव्या मंत्र्यांचा शपथविधी झाला असून, यात ११ कॅबिनेट तर चार राज्यमंत्री आहेत. दोन वर्षांनी होणारी विधानसभा निवडणूक विचारात घेऊन जातीय संतुलन राखण्याचा प्रयत्न मंत्रिमंडळ विस्तारात झाला आहे.

नव्या मंत्र्यांमध्ये अनुसूचित जातीचे चार तर अनुसूचित जमातीच्या तिघांचा समावेश आहे. ममता भूपेश, भजन लाल जाटव, टिकाराम जुले या तीन राज्यमंत्र्यांना बढती देण्यात आली आहे, तर गेल्या वर्षी बंड करणाऱ्या विश्वेंद्र सिंह तसेच रमेश मीणा यांचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे. हेमाराम चौधरी, महेंद्रजित सिंह मालवीय, रामलाल जाट, महेश जोशी, गोविंदराम मेघवाल आणि शकुंतला रावत यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. झाहिदा, ब्रिजेंद्रसिंह ओला, राजेंद्र गुढा आणि मुरारीलाल मीणा यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. आता राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त १९ कॅबिनेट व दहा राज्यमंत्री आहेत.  सचिन पायलट यांनी बंड केल्यानंतर १६ महिन्यांनंतर हे फेरबदल करण्यात आले आहेत. १८ आमदारांसह पायलट यांनी बंड केले होते. मंत्रिमंडळात पायलट यांच्या पाच समर्थकांना संधी देण्यात आली आहे. राज्यात काँग्रेसमध्ये कोणतीही गटबाजी नसल्याची ग्वाही सचिन पायलट यांनी दिली आहे.

विस्तारात शकुंतला रावत तसेच झाहिदा या दोन महिलांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात तीन महिला मंत्री आहेत.