Sachin Pilot Punjab School Inspection News: राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि पंजाबचे नवनियुक्त काँग्रेस प्रभारी सचिन पायलट यांनी शुक्रवारी कॉक्रोच जनता पार्टीला (सीजेपी) टोला लगावला. सीजेपीकडून सध्या सरकारी शाळांची पाहणी सुरू आहे. या शाळांमध्ये मूलभूत सोयी सुविधा नसल्याची बाब सीजेपीकडून समोर आणली जात आहे. या मोहिमेला इंटरनेटवरून अनेकांनी पाठिंबा दिला. सीजेपीने अशाच प्रकारची मोहीम आम आदमी पक्षाचे सरकार असलेल्या पंजाबमध्येही चालवावी, असे आव्हान काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी दिले आहे.
कॉक्रोच जनता पार्टीचे सह-संयोजक सौरव दास यांनी पंजाबच्या लुधियानामधील तीन शाळांची पाहणी केल्यानंतर सचिन पायलट यांनी ही टीका केली. सौरव दास यांनी सोशल मीडियावर या पाहणीचा व्हिडीओ शेअर केला होता. ‘स्कूल ऑफ एमिनन्स’ या शाळेत स्विमिंग पूल, बॅडमिंटन कोर्ट, दिव्यांगांसाठी रॅम्पची सोय, एआय लॅब इत्यादी पायाभूत सोयी-सुविधा असल्याचे दास यांनी दाखवले.
तर इतर दोन शाळांत काही अडचणी होत्या. तसेच तीनही ठिकाणी चांगली शौचालये असायला हवी होती, असे दास व्हिडीओत म्हणाले. या पाहणीनंतर सौरव दास आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंजाबचे शिक्षण मंत्री हरजोत सिंग बैन्स यांचीही भेट घेतली. सीजेपीच्या तक्रारीनंतर त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे दास म्हणाले.
आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शाळांमधील त्रुटी दाखवून दिल्याबद्दल सौरव दास यांचे आभार मानले. आम्ही या सूचनांवर तात्काळ उपाययोजना करू, असेही त्यांनी म्हटले. मात्र सोशल मीडियावरून सीजेपीच्या या पाहणीवर टीका करण्यात येत आहे. पंजाबमध्ये ‘आप’चे सरकार असल्यामुळे कॉक्रोच जनता पार्टी नरमाईची भूमिका घेत असल्याच आरोप करण्यात येत आहे.
राजस्थानमध्ये सीजेपी आक्रमक
सचिन पायलट राजस्थानमधून येतात. या राज्यात शाळांच्या पाहणीची सुरुवात २१ ऑगस्ट रोजी गोठ्यात चालणाऱ्या एका शाळेपासून करण्यात आली होती. सीजेपीचे सहसंयोजक आशुतोष रांका हे सहकाऱ्यांसह शाळेत जात असताना काही जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोर भाजपाचे लोक असल्याचा आरोप रांका यांनी केला होता. यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. आशुतोष रांका आणि इतरांवर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सचिन पायलट काय म्हणाले?
शुक्रवारी माध्यमांशी बोलत असताना सचिन पायलट म्हणाले, “पंजाबमध्ये किंवा इतर ठिकाणी शाळांची पाहणी होत असेल तर त्याचेही कुणीही स्वागतच करेल. पण त्यांना एक सूचना आहे की, ज्या आक्रमकपणे आणि धैर्याने त्यांनी इतर राज्यांत शाळांचे ऑडिट केले. त्याच पद्धतीचे धाडस त्यांनी पंजाबमध्येही दाखवावे. पंजाबवर मेहेरनजर दाखविण्याचे काहीही कारण नाही.”
पंजाब में कांग्रेस पूरी मजबूती और बुलंद हौसलों के साथ चुनावी मैदान में है। मुझे पूरा विश्वास है कि जनता अपना समर्थन और आशीर्वाद कांग्रेस को देगी ।
— Sachin Pilot (@SachinPilot) September 11, 2026
AAP की राज्य सरकार की नाकाम नीतियों का हिसाब लेने के लिए जनता तैयार है। वहीं, BJP और अकाली दल अपनी खोई हुई राजनीतिक ज़मीन तलाशने… pic.twitter.com/Fd6XgjF9RQ
सचिन पायलट यांनी टीका केल्यानंतर आम आदमी पक्षाच्या नेत्यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. पंजाबमधील शाळांची तुलना काँग्रेसशासित हिमाचल प्रदेशशी करण्याचे आवाहन त्यांनी केले. दिल्लीचे माजी शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया म्हणाले, “आम्ही उत्कृष्ट अशा १,००० शाळा दाखवू शकतो, पण काँग्रेस अशा १,००० शाळा हिमाचल प्रदेशमध्ये दाखवू शकते काय? चला, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमधील शाळांचे ऑडिट एकत्र करूयात. बोला हे आव्हान स्वीकारता का?”
