मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा २०२६पासून सुरू आहेत. अर्जुन तेंडुलकर सानिया चंडोकबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. या दोघांच्या लग्नाची तारीखही रिपोर्ट्समध्ये समोर आली होती. अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा २०२५ मध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्यात आळा. सचिन तेंडुलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिल्लीतल्या दिग्गजांना विवाह सोहळ्याचं निमंत्रण दिलं. मात्र राहुल गांधींना जे निमंत्रण दिलं ती पोस्ट सचिन तेंडुलकरला डिलिट करायला लावली असा दावा काँग्रेसने केला आहे.

काय म्हटलं आहे काँग्रेसने?

सचिन तेंडुलकर मंगळवारी दिल्लीत होते. त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण दिल्लीतल्या दिग्गज नेत्यांना दिलं. तसंच त्यानंतर त्यांच्या एक्स पोस्टवर फोटोही शेअर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं, त्यांच्यासह असलेला फोटो सचिनने संध्याकाळी ७ वाजून १३ मिनिटांनी पोस्ट केला होता. तर अमित शाह यांच्यासह काढलेला फोटो ८ वाजून १८ मिनिटांनी पोस्ट केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह काढलेला फोटो ८ वाजून ४८ मिनिटांनी पोस्ट केला तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काढलेला फोटो ९ वाजून २२ मिनिटांनी पोस्ट केला. या फोटोंपैकी राहुल गांधींसह असलेला सचिनचा फोटो व्हायरल झाला. या फोटोला दोन तासात 627 K इतके व्ह्यूज आले. मात्र यानंतर असूये पोटी एक गोष्ट घडली.

असूयेपोटी पोस्ट डिलिट करायला लावली

सचिन तेंडुलकरच्या सोशल मीडिया टीमला सचिन तेंडुलकर आणि राहुल गांधी यांचा फोटो डिलिट करण्यासाठी सांगण्यात आलं. त्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. तसंच रात्री १२.१९ ला पोस्ट पुन्हा पोस्ट करण्यास सांगण्यात आलं. या फोटोची फार दखल घेतली जाऊ नये हा त्यामागचा हेतू होता. मात्र लोकांनाही ही गोष्ट लक्षात आली. देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या माणसाला राहुल गांधींच्या सोशल मीडियावरच्या व्ह्यूजचीही भीती वाटते आहे. असा दावा काँग्रेसने केला आहे.

सोशल मीडियावर लोक काय म्हणत आहेत?

सचिनने ती पोस्ट डिलिट का केली असा प्रश्न काही लोकांनी उपस्थित केला आहे. काहींनी राहुल गांधींना सोशल मीडियावर पंतप्रधान करा म्हणत खिल्लीही उडवली आहे. काँग्रेसने उगाचच असा अर्थ लावला आहे असंही काही युजर्स म्हणत आहेत. काँग्रेसच्या या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

अर्जुनची होणारी पत्नी सानिया चंडोक कोण आहे?

सानिया चंडोक ही एक यशस्वी उद्योजिका आहे. ती मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. सानिया ‘पेट केअर’ ब्रँडची मालकीणआहे आणि ती तेंडुलकर कुटुंबाला खूप काळापासून ओळखते. सानिया ही सारा तेंडुलकर व अर्जुनची बालपणीची मैत्रिणदेखील आहे. सारा अनेकदा सानिया चंडोकबरोबर फोटो शेअर करत असते. इतकंच नव्हे तर तेंडुलकर कुटुंबांच्या कार्यक्रमांना व सहलींना देखील सानिया दिसली आहे. साराच्या पिलाटेस अकॅडमीच्या उद्घाटन सोहळ्यालादेखील ती उपस्थित होती.