पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला नुकतीच १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने विशेष कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं. तर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकाही केली आहे. दुसरीकडे मोदी काळात भारत घडला की बिघडला? यावर साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी भाष्य केलं आहे. काँग्रेस विचार खरंच संपला आहे का? यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.
काय म्हटलं आहे विनोद शिरसाठ यांनी?
नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची १२ वर्षे मिळाली. सलग बारा वर्षे ते पंतप्रधान आहेत. इतका मोठा कालखंड हा इंदिरा गांधींना मिळाला होता. त्यापेक्षा मोठा कालावधी हा जवाहरलाल नेहरुंना मिळाला. पंडित नेहरु हे १८ वर्षे पंतप्रधान होते. पंडित नेहरु यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असं म्हटलं जात होतं. २०१४ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी निमित्त असंच शोधलं होतं. जवाहरलाल नेहरुंच्या मृत्यूला ५० वर्षे पूर्ण होणार होती त्याच्या आदल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाला होता. आत्ता आपण १२ वर्षांकडे पाहिलं तर नरेंद्र मोदींची पंतप्रधान म्हणून तुलना ही पंडित नेहरुंशी व्हायला हवी होती. पण तशी ती होत नसून ती तुलना इंदिरा गांधींशी होते. फक्त १२ वर्षे हेच त्यांचं कारण नाही. इंदिरा गांधी या आक्रमक होत्या. त्यांच्याविषयीही एका बाजूला प्रचंड प्रेम आणि एका बाजूला प्रचंड द्वेष असं वातावरण होतं. इंदिरा गांधींनी ध्रुवीकरण घडवून आणलं. तसंच काहीसं नरेंद्र मोदींच्या बाबतीत घडतं आहे. नरेंद्र मोदी वादग्रस्तही ठरले. प्रचंड प्रेम आणि टोकाचा द्वेष असं दोन्ही त्यांच्या बाबतीत घडलं. मोदींचं यश काय? तर इंदिरा गांधींशी त्यांची तुलना केली जाते आणि अपयश काय तर पंडित नेहरुंच्या एकूण कारकिर्दीच्या आसपासही त्यांचं मूल्यमापन करता येत नाही असं विनोद शिरसाठ यांनी म्हटलं आहे. थिंक बँक या युट्यूब चॅनलला त्यांनी जी मुलाखत दिली त्यात त्यांनी हे भाष्य केलं आहे.

मोदी आणि इंदिरा गांधी यांच्या स्वभावातच एकाधिकारशाही-विनोद शिरसाठ
इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्या स्वभावाचा गाभा किंवा व्यवच्छेदक लक्षण म्हणजे एकाधिकारशाही. त्यामुळे ध्रुवीकरणाचा मुद्दा हा त्यांच्यामुळेच मोठा झाला असावा. दोन्ही नेत्यांनी आपल्या आपल्या पक्षांवर पूर्णतः पकड मिळवली. पक्षातले जे विरोधक असतील त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे नेस्तनाबूत केलं किंवा आपल्या बाजूने वळवून घेतलं. स्वतःच्या पक्षावर पूर्ण पकड मिळवली की देशातल्या यंत्रणा, संसद, न्यायलय, निवडणूक आयोग यांच्यापासून अगदी प्रसारमाध्यमांपर्यंत गोष्टींवर दोन्ही नेत्यांनी पकड मिळवली. दोन्ही नेत्यांमध्ये हा कॉमन घटक दिसतो. व्यक्तिमत्वात एकाधिकारशाहीची वृत्ती. लोकशाहीवर दोघांचाही म्हणजेच इंदिरा गांधी असोत किंवा आता नरेंद्र मोदी यांचा किती विश्वास असावा याबाबत शंका आहे. लोकशाहीच्या संदर्भात मी इंदिरा गांधींना झुकतं माप देईन, पण एकाधिकारशाही मात्र दोघांचीही सारखी होती असं मला वाटतं.

ध्रुवीकरणाबाबत काय म्हणाले विनोद शिरसाठ?
१९७५ मध्ये इंदिरा गांधींनी जसं ध्रुवीकरण केलं आणि त्यासाठी काँग्रेस व्हर्सेस ऑल. तसंच नरेंद्र मोदींच्या काळात झालेलं दिसतं आहे. भाजपाच्या विरोधात इतर सगळे पक्ष अगदी एकेकाळचे त्यांचे मित्र पक्षही गेल्याचं दिसतं आहे. एक बाब मान्य करावी लागेल की इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेस वगळता इतर पक्ष हे दुर्बल होते. नरेंद्र मोदींच्या काळात अन्य पक्ष दुर्बल नव्हते.१२ वर्षांच्या काळात त्यांनी ते पक्ष दुर्बल केले. तसंच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्वसामान्य माणसांवर हुकूमत असणं हा देखील लक्षात घेतला पाहिजे. इंदिरा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांची ही विशेषतः आहे. इंदिरा गांधींच्या काळात भ्रष्टाचार खूप बोकाळला आहे दिसत होतं. अगदी खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत भ्रष्टाचार होता, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात हा भ्रष्टाचार खालच्या स्तरावर कमी दिसतो, वरच्या स्तरावर तो जास्त असावा असे काही फरक दाखवता येतील. देशातल्या घटनात्मक यंत्रणांना खिळंखिळं करणं ते पक्षावर पकड मिळवणं या दोन्ही गोष्टी दोन्ही नेत्यांच्या काळात घडल्या आहेत. त्यामुळे लोकशाही इंदिरा गांधींच्या काळातही धोक्यात होती आणि या काळातही धोक्यात आहे असंही विनोद शिरसाठ यांनी म्हटलं आहे.
होय.. ती मोदींची महत्त्वाकांक्षा असू शकते-शिरसाठ
नरेंद्र मोदींनी सातत्याने पंडित नेहरुंना टार्गेट केलं आहे. इंदिरा गांधींवर त्यांनी मागील १२ वर्षांमध्ये फारशी टीका केल्याचं दिसत नाही. त्यामुळे आपलं स्थान हे पंडित नेहरुंच्या सारखं किंवा त्यांच्यापेक्षा वरचं असावं ही त्यांची महत्त्वाकांक्षा असू शकते. सत्तेवर आल्यानंतर नरेंद्र मोदी म्हणत होते की काँग्रेसमुक्त भारत हे माझं स्वप्न आहे. मात्र मागील महिन्यातच त्यांनी राष्ट्राला उद्देशून जे भाषण केलं त्या भाषणात प्रत्येक दोन वाक्यांच्या मागे त्यांनी एकदा काँग्रेसचं नाव घेतलं. १२ वर्षांपूर्वी काँग्रेसमुक्त भारताचं स्वप्न दाखवणाऱ्या पंतप्रधानांना काँग्रेसचा उल्लेख पुन्हा पुन्हा करावा लागतो आहे ते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वैफल्य आहे असं मला वाटतं असंही विनोद शिरसाठ यांनी म्हटलं आहे. कांँग्रेस पक्ष संपवणं हे मोदींचं उद्दीष्ट नसेल, तर काँग्रेसचा विचार संपवणं हे त्यांचं लक्ष्य होतं असं वाटतं. पण तसं घडलं नाही हे देखील मान्य करावं लागेल. काँग्रेसचा विचार जिओ और जिने दो असा आहे. हा विचार बाजूला सारुन आम्ही विरुद्ध ते असं वर्चस्व निर्माण करायचं आणि आपला सांस्कृतिक राष्ट्रवाद निर्माण करता येईल असं मोदींना वाटत असावं.
