साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानावरून गेल्या दोन दिवसांपासून राज्यसभेत सुरू असणारा गदारोळ सलग तिसऱया दिवशीही सुरू असल्याने अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडले. आम्ही अशा वादग्रस्त विधानाचा निषेधच करतो. मात्र साध्वींनी माफी मागितली असून विरोधकांनीही त्यांना माफ करून राष्ट्रहितासाठी संसदेचे कामकाज चालू द्यावे, अशी विनंती नरेंद्र मोदींनी राज्यसभेत केली.
साध्वींच्या वादग्रस्त विधानाची कल्पना भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत देण्यात आली होती. त्यावेळी साध्वींच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त करून एका जबाबदार मंत्र्याने अशाप्रकारची विधाने टाळली पाहिजेत, असे सांगितले असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. तसेच साध्वी निरंजन ज्योती या पहिल्यांदाच मंत्रीपद भूषवत आहेत आणि संसदेच्या नवीनच सदस्य आहेत. त्यामुळे संसदेने मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी मागितलेली माफी स्वीकारावी, अशी विनंती मोदींनी राज्यसभेत केली. मोदींनी उत्तरावरही विरोधकांचे समाधान झाले नाही व राज्यसभेचे कामकाज पुन्हा तहकूब करावे लागले. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असून सभागृहात सुरु असलेला गोंधळ योग्य नाही अशा शब्दात राज्यसभा अध्यक्षांनी सर्व खासदारांना सुनावले. साध्वी निरंजन ज्योती यांच्या विधानावरुन विरोधक आक्रमक झाले असून साध्वी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक गेल्या तीन दिवसांपासून करत आहेत.