Sadhvi Prem Baisa Death : राजस्थानच्या जोधपूर या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या आणि प्रसिद्ध कथावाचक साध्वी प्रेम बाईसा यांचं नाव त्यांच्या मृत्यूनंतर चर्चेत आलं आहे. एक व्हायरल व्हिडीओ समोर आला आहे. ज्यानंतर प्रेम बाईसांवर त्या व्हिडीओचा तणाव आला आणि त्यांचं निधन झालं. या सगळ्या घटनांची साखळी पोलीस जोडत आहेत. त्यांचा मृत्यू नैसर्गिक आहे की हत्या याचाही तपास केला जातो आहे. आपण जाणून घेऊ हे संपूर्ण प्रकरण काय आहे?
साध्वी प्रेम बाईसा कोण होत्या?
साध्वी प्रेम बाईसा या धार्मिक कथा वाचक होत्या. गेल्या काही वर्षांपासून साध्वी प्रेम बाईसा या भागवत कथा, भजन-किर्तन आणि धार्मिक प्रवचनांमध्ये त्यांचा वेळ घालवत असतं. सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार हे त्यांचं प्रमुख कार्य होतं. ग्रामीण भागांमध्ये आणि खेडेगावांमध्ये राहणारे लोक त्यांच्या कथा वाचनाला, प्रवचनाला आवर्जून उपस्थित राहात असत.

साध्वी प्रेम बाईसा यांचं बालपण कसं होतं?
साध्वी प्रेम बाईसा यांचा जन्म बाडमेर जिल्ह्यातील परेऊ या ठिकाणी झाला. त्यांच्या कुटुंबातही धार्मिक आणि प्रवचनाची परंपरा होती. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची गोडी लागली. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्यांचा ओढा अध्यात्माकडे मोठ्या प्रमाणावर वाढला. ज्यानंतर त्या साध्वी झाल्या आणि कथा वाचन, प्रवचन करु लागल्या. त्यांचे गुरु आणि त्यांचे वडील महंत वीरमनाथ यांच्या शिष्य म्हणून त्या भजन-किर्तन करत असत.
सोशल मीडियावर कथा वाचनाचे व्हिडीओ व्हायरल
मागील काही वर्षांपासून सोशल मीडियावरही प्रेम बाईसा या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर वाढली होती. त्यांच्या भजनाचे, कथांचे व्हिडीओ व्हायरल होत असत. याच सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ आला आणि तोच व्हिडीओ त्यांच्या तणावाचं कारण बनला.
‘त्या’ व्हायरल व्हिडीओचं प्रकरण काय?
साध्वी प्रेम बाईसा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ २०२५ चा आहे असं सांगण्यात आलं. या व्हिडीओ साध्वी प्रेम बाईसा या पलंगावर झोपलेल्या असतात. भगवी वस्त्रं घातलेला एक साधू तिथे येतो. त्या त्याला मिठी मारतात आणि पुढे अश्लील चाळे सुरु होतात असा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओतला व्यक्ती म्हणजे साध्वी प्रेम बाईसांचे वडील महंत वीरमनाथ आहेत असाही दावा काहींनी केला आहे. मात्र त्याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. या व्हिडीओनंतर साध्वी प्रेम बाईसाने समोर येत स्पष्टीकरणही दिलं होतं.
साध्वी प्रेम बाईसांचं स्पष्टीकरण काय होतं?
साध्वी प्रेम बाईसांनी व्हायरल व्हिडीओबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. माझा व्हिडीओ जो पोस्ट करण्यात आला आहे तो बनावट आणि एडिटेड आहे. या व्हायरल क्लिपमध्ये फेरफार करण्यात आले आहेत. चुकीच्या पद्धतीने आणि आक्षेपार्ह वाटेल असाच हा व्हिडीओ जाणीवपूर्वक तयार करण्यात आला आहे. माझ्याकडे व्हिडीओच्या बदल्यात पैसेही मागितले गेले असाही दावा त्यांनी केला होता. तसंच या प्रकरणात मी पोलिसात तक्रार दिल्याचंही साध्वी प्रेम बाईसा यांनी म्हटलं होतं.
साध्वी प्रेम बाईसा यांचा मृत्यू कसा झाला?
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात साध्वी प्रेम बाईसांची प्रकृती बिघडली. त्यावेळी त्या जोधपूरच्या आश्रमात होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. साध्वी प्रेम बाईसा यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. साध्वी प्रेम बाईसा यांची प्रकृती बिघडावी म्हणून त्यांना एक इंजेक्शन देण्यात आलं होतं का? इंजेक्शनमध्ये कुठलं औषध होतं? ते इंजेक्शन कुणी दिलं? हे आणि असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. दरम्यान साध्वी प्रेम बाईसा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट आली होती ज्याचीही चर्चा झाली.
साध्वी प्रेम बाईसांच्या मृत्यूनंतर आलेली पोस्ट काय होती?
साध्वी प्रेम बाईसांच्या मृत्यूनंतर एक पोस्ट समोर आली. ज्यात लिहिलं होतं की, “मी कायम, प्रत्येक क्षणी सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. जगात सनातन धर्मापेक्षा कुठलाही धर्म मोठा नाही. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या मनात, हृदयात फक्त सनातन धर्म आहे. मी सनातन धर्मात जन्म घेतल्याचा अभिमान आहे आणि याच धर्मात मी अखेरचा श्वास घेतला.” अशी पोस्ट करण्यात आली होती. ही पोस्ट कुणी केली? याचाही तपास सुरु आहे.

