Saharanpur mosque demolition debris well : उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील एका मशि‍दीचे पाडकाम करण्यात आले. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. मात्र, आता रविवारी जिल्हा अधिकाऱ्यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. मशिदीचं पाडकाम केल्यानंतर तिथे ढिगाऱ्याखाली त्यांना एक विहिर सापडली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

दगडी बांधकामांनी झाकलेली ही विहीर सुमारे २० फूट खोल आणि १.५ मीटर रुंद आहे. सहारनपूरचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी संतोष बहादूर सिंग यांनी सांगितलं की, मशिदीच्या पाडकामानंतर जेव्हा एक जेसीबी ढिगारा साफ करत होता, तेव्हा तो अचानक एका दगडी बांधकामावर अडकला. “त्यानंतर कामगारांनी कटरचा वापर करून हे बांधकाम तोडले, त्याखाली ही विहीर आढळून आली”, असं एडीएम यांनी सांगितलं. तसंच, प्रशासनाने यावर पुढील कारवाईबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असंही स्पष्ट केलं.

विहिरीचे ऐतिहासिक महत्त्व तपासणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासन या विहिरीचे वय आणि तिचे ऐतिहासिक महत्त्व तपासण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या तज्ज्ञांना पाचारण करण्याची योजना आखत आहे. सध्या विहिरीत ढिगारा पडू नये म्हणून ती झाकण्यात आली असून, बाहेरील लोकांना या परिसरात येण्यापासून रोखण्यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत आणि बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

संबंधित मशीद एका अनधिकृत सरकारी जमिनीवर उभी असल्याचा निकाल देणाऱ्या पूर्वीच्या आदेशाविरोधातील अपील जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर तीन दिवसांनी ही मशीद पाडण्यात आली. विकास त्यागी यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने मशिदीची चौकशी केली होती आणि त्यानंतर सिटी मॅजिस्ट्रेट न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यागी यांनी आता या विहिरीचीही सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मशिदीच्या खाली आणखी काय असू शकते, हे शोधण्यासाठी एएसआयच्या पथकाला बोलावण्यात यावं, अशी मागणी त्यांनी केली.

जुलै महिन्यात सिटी मॅजिस्ट्रेटने ३० दिवसांच्या आत मशीद रिकामी करण्याचे आदेश दिले होते, तेव्हा ही मशीद अनधिकृत बांधकाम घोषित करण्यात आली होती. उत्तर प्रदेश सार्वजनिक परिसर (अनधिकृत रहिवाशांचे निष्कासन) अधिनियम, १९७२ अंतर्गत आदेश जारी करत न्यायालयाने ३१५ चौरस मीटर सरकारी जमिनीवर अनधिकृत ताबा मिळवल्याबद्दल बेकायदेशीर रहिवाशांवर ६.४१ कोटी रुपयांचा दंड देखील ठोठावला होता. मशिदीचे मुतवल्ली, तन्वीर अहमद यांनी असा आरोप केला आहे की, पाडकामाची कारवाई योग्य प्रक्रियेचे पालन न करता करण्यात आली. तर सहारनपूरचे काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी या पाडकामाचे वर्णन सहारनपूरच्या जनतेसाठी काळा दिवस असे केले. प्रशासनाने रहिवाशांना सर्व बाजूंनी वेढले, त्यांना त्यांच्या घरात डांबून ठेवले आणि मशीद जमीनदोस्त केली, असा आरोप त्यांनी केला.