नगर : मराठी व दखनी भाषेच्या स्नेहसंबंधावर संशोधनात्मक प्रकाशझोत टाकणारे प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांना साहित्य अकादमीचा ‘भाषा सन्मान पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय प्रा. आझम यांना शुक्रवारी कळवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रा. आझम अहमदनगर महाविद्यालयातील हिंदी, उर्दू व फारसी भाषेचे सेवानिवृत्त विभागप्रमुख आहेत. त्यांचा ‘कदमराव पदमराव- दखनीचा आद्य काव्यग्रंथ- दखनी-मराठी अनुबंध’ हा संशोधनात्मक ग्रंथ सन २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केला. त्यांची यापूर्वी ‘सुफी तत्त्वज्ञान स्वरूप व चिंतन’ ‘सुफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ हा त्रिखंडात्मक, तसेच ‘नमाज-रहस्य व तत्त्वज्ञान’ असे तीन संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. प्रा. आझम मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मैंदर्गीचे (अक्कलकोट) आहेत, मात्र ते नगरमध्येच पूर्वीपासून स्थायिक झाले आहेत.

सुमारे ४५० ते ५०० वर्षांपूर्वी ‘कदमराव पदमराव’ हा आद्य काव्यग्रंथ कवी फक्रुद्दीन निजामी बिदरी यांनी लिहिलेला आहे. तो हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध आहे. जैन दंतकथा व पुनर्जन्मावर आधारित हे काव्य आहे. त्यामध्ये २ हजार श्लोक (कडवे) आहेत. परंतु तो अपूर्ण अवस्थेत आहे. या ग्रंथाचा प्रा. आझम यांनी भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, राजकारण व भूगोल या दृष्टिकोनातून संशोधनात्मक अभ्यास करून मराठी व दखनी भाषेतील स्नेहसंबंधावर प्रकाश टाकला आहे.

 त्यातून मराठी व दखनी भाषा या भगिनी आहेत. मराठी ज्येष्ठ तर दखनी कनिष्ठ बहीण आहे, मराठी भाषेचे संस्कार दखनी भाषेवर झाले आहेत. अनेकानेक मराठी शब्दांनी दखनी भाषेचे वैभव, गोडवा वाढवला. दखनी ही आर्यभाषाच आहे. दखनी ही अभिजात व श्रेष्ठ भारतीय भाषा आहे. बहमनी साम्राज्याचे विघटन झाल्यानंतर निजामशाही व अन्य चार शाह्यांच्या काळात दखनी मोठय़ा प्रमाणावर बोलली जात असे. या भाषेत विपुल साहित्यही निर्माण झालं. अठराव्या शतकात उर्दूचा प्रभाव वाढला, अरबी, फारसी शब्दांचा वापर वाढून दखनी मागे पडली, असे प्रा. आझम यांनी सांगितले.

अहमदनगर, औरंगाबाद, कर्नाटकातील बिदर या भागातील लोकांची हीच भाषा होती. ग्रामीण भागात अजूनही काही प्रमाणात दखनीच बोलली जाते. विशेषत: सोलापूर भागात दखनीचा प्रभाव जास्त आहे, असे त्यांनी सांगितले. प्रा आझम मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मैंदर्गीचे (अक्कलकोट) आहेत, मात्र ते नगरमध्येच पूर्वीपासून स्थायिक झाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sahitya akademi language honor award muhammad azam ysh
First published on: 25-06-2022 at 00:02 IST