Ex-Libyan dictator Muammar Gaddafi’s son shot dead: दक्षिण आफ्रिका खंडातील लिबिया या देशाचे माजी नेते मुअम्मर गद्दाफी यांचा मुलगा सैफ अल-इस्लाम गद्दाफी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. लिबियन न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, ५३ वर्षीय सैफ अल-इस्लाम यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे. त्यांच्या वकिलाने सांगितले की, झिंटान शहरातील त्यांच्या घरात चार जणांच्या कमांडो युनिटने हा हल्ला केला. मात्र, या हत्येमागे नेमका कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वडिलांच्या सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका

सैफ अल-इस्लाम यांना एकेकाळी त्यांच्या वडिलांचे उत्तराधिकारी तसेच मुअम्मर गद्दाफीनंतर लिबियातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती मानले जात होते. मुअम्मर गद्दाफी यांनी १९६९ पासून २०११ मधील उठावात पदच्युत होईपर्यंत लिबियावर राज्य केले. १९७२ मध्ये जन्मलेल्या सैफ यांनी २००० सालापासून गद्दाफी राजवटीच्या पतनापर्यंत लिबियाचे पाश्चात्त्य देशांशी संबंध सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

मृत्युदंडाची शिक्षा

सैफ अल-इस्लाम यांना दीर्घकाळ तुरुंगवासही भोगावा लागला होता. वडिलांना सत्तेवरून हटवण्यात आल्यानंतर सरकारविरोधी निदर्शनांवर करण्यात आलेल्या क्रूर दडपशाहीत त्यांची महत्त्वाची भूमिका होती, असा आरोप त्यांच्यावर होता. झिंटान शहरातील प्रतिस्पर्धी मिलिशियाने सैफ यांना सहा वर्षे तुरुंगात ठेवले होते. २०१५ साली त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्यात आली होती. लिबियन न्यायालयाने त्यांच्या अनुपस्थितीत सैफ यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती.

वडिलांच्या सरकारमध्ये महत्त्वाचे काम

वडिलांच्या सरकारमध्ये कोणतेही अधिकृत पद नसतानाही, सैफ अल-इस्लाम यांनी धोरणे आखली आणि अनेक उच्चस्तरीय वाटाघाटी केल्या. यामध्ये मुअम्मर गद्दाफी यांनी अण्वस्त्र कार्यक्रम सोडण्यास मान्यता दिलेल्या महत्त्वपूर्ण चर्चांचाही समावेश होता. या करारांमुळे लिबियावर लादलेले आंतरराष्ट्रीय निर्बंध उठवण्यात आले होते. परिणामी, वडिलांच्या सरकारमध्ये सैफ यांचे महत्त्व आणि प्रभाव अधिक वाढला होता.

निवडणूक लढवण्याची इच्छा

सैफ अल-इस्लाम यांनी २०२१ मध्ये अस्थिरतेचा सामना करत असलेल्या लिबियामध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा आपला इरादा जाहीर केला होता. मात्र, या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. तथापि, सैफ यांनी नेहमीच आपल्या वडिलांकडून सत्ता वारशाने मिळवण्याची इच्छा असल्याचे नाकारले होते. ते म्हणाले होते की, शेतीच्या जमिनीप्रमाणे सत्ता वारशाने मिळत नाही.