समुद्राच्या अथांग पाण्यात हजारो किलोमीटरचा प्रवास करत असताना अचानक समोर आलेल्या जहाजावर आपलेच वडील असल्याचं लक्षात येणं, हा अगदी थक्क करणारा अनुभव ठरू शकतो. मात्र, दोन खलाशांच्या आयुष्यात हा अनोखा क्षण खरोखर घडला. रुशील सरन आणि त्यांचे वडील वेगवेगळ्या जहाजांवरून विरुद्ध दिशेने प्रवास करत असताना समुद्राच्या मध्यभागी अचानक एकमेकांसमोर आले. रुशील यांनी हा भावुक क्षण सोशल मीडियावर शेअर केला असून त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विरुद्ध दिशेने जाणारी दोन जहाजे
रुशील उत्तर दिशेने जहाजातून प्रवास करत होते. त्याच वेळी समोरून एक मोठं जहाज येताना त्यांना दिसलं. उत्सुकतेपोटी त्यांनी नेव्हिगेशन चार्ट तपासला. त्यावेळी समोरचं जहाज आपल्या वडिलांचं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
“समुद्राच्या मध्यभागी माझ्या आयुष्यातील कदाचित सर्वात खास पिता-पुत्र क्षण अनुभवला. मी उत्तर दिशेने जात होतो आणि समोरून एक मोठं जहाज येताना दिसलं. चार्ट तपासला आणि ते माझ्या वडिलांचं जहाज असल्याचं समजलं,” असं रुशील यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं.
वडिलांचा संदेश मुलाच्या मनात घर करून गेला
या अनपेक्षित भेटीपेक्षा दोघांमध्ये झालेला संवाद अधिक भावुक करणारा ठरला. वडिलांनी मुलाला सांगितलेला संदेश रुशील यांनी सोशल मीडियावर शेअर केला.
“या अथांग पसरलेल्या समुद्रात एक वडील आणि मुलगा एकमेकांना भेटले. दोघेही वेगवेगळ्या दिशेने प्रवास करत होते, पण त्यांना जोडणारा समुद्र एकच होता. कदाचित मोठं होणं म्हणजे हेच. अखेर तुम्ही तुमचा स्वतःचा मार्ग निवडता, पण आयुष्याचा मार्ग दाखवणाऱ्या व्यक्तीबरोबरचा प्रवास कधीच पूर्णपणे संपत नाही,” असा संदेश त्यांच्या वडिलांनी दिला. वडिलांचे हे शब्द रुशील यांच्यासाठी कायमस्वरूपी आठवण बनले.
‘वन इन अ बिलियन चान्स’
या भेटीचं वर्णन करताना रुशील यांनी हा प्रसंग “वन इन अ बिलियन चान्स” असल्याचं म्हटलं. “दोन पिढ्यांतील खलाशी, दोन जहाजं, दोन वेगवेगळे प्रवास आणि समुद्राच्या मध्यभागी झालेली एक अविस्मरणीय भेट,” अशा शब्दांत त्यांनी हा अनुभव व्यक्त केला.
व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्सही भावुक झाले आहेत. अनेकांनी ही खलाशांच्या आयुष्यातील अत्यंत दुर्मीळ आणि हृदयस्पर्शी भेट असल्याचं म्हटलं आहे.
