काळवीट शिकार प्रकरण : सलमान खानला न्यायालयाचे समन्स

जोधपूरमधील जिल्हा व सत्र न्यायालयाने सलमानला बोलावण्याचे आदेश दिले आहेत.

salman khan, सलमान खान
सरकारी पक्षाने दिलेल्या पाच साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आल्यानंतर या प्रकरणातील सुनावणी न्यायालयात पूर्ण झाली

काळवीट शिकार खटल्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला येत्या १० मार्च रोजी जोधपूरमधील न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात सलमान खानची बाजू यावेळी नोंदविण्यात येणार आहे.
जोधपूरमधील जिल्हा व सत्र न्यायालयाने सलमानला बोलावण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात बचाव पक्षाने सरकारी पक्षाच्या सर्व साक्षीदारांची फेरतपासणी घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती ती न्यायालयाने फेटाळली. खटल्यातील आरोपीची बाजू नोंदवून घेण्यासाठी सलमान खान दहा मार्च रोजी न्यायालयात उपस्थित राहिल, याची काळजी बचाव पक्षाने घ्यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
सरकारी पक्षाने दिलेल्या पाच साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आल्यानंतर या प्रकरणातील सुनावणी न्यायालयात पूर्ण झाली. मात्र, त्यानंतर लगेचच बचाव पक्षाचे वकील एच. एम. सारस्वत यांनी नव्याने अर्ज करून साक्षीदार मिश्रा यांची फेरतपासणी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. पण न्या. दलपतसिंग राजपुरोहित यांनी बचाव पक्षाची मागणी फेटाळून लावत फेरतपासणीसाठी बचाव पक्षाला पुरेसा वेळ देण्यात आला असल्याचे स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Salman khan summoned by jodhpur court for recording statement

ताज्या बातम्या