काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांच्या नव्या पुस्तकावरून सध्या मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’, असं या पुस्तकाचं नाव असून त्यामध्ये सलमान खुर्शिद यांनी हिंदुत्वाची तुलना आयसिस, बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केल्यामुळे भाजपाकडून त्यावर जोरदार आक्षेप घेण्यात आला आहे. या पुस्तकातील संदंर्भावर भाजपाकडून टीका करताना ‘मुस्लिम मतांसाठी भगवा दहशतवादसारख्या कल्पना वापरणाऱ्या पक्षाच्या सदस्याकडून अजून काय अपेक्षा केली जाऊ शकते?’ असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे.

काय आहे या पुस्तकात?

‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’ या पुस्तकातल्या ‘द सॅफ्रॉन स्काय’ या प्रकरणामध्ये सलमान खुर्शिद यांनी ही तुलना केली आहे “ऋषीमुनी आणि संतांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म आणि हिंदुत्व गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरुपामुळे बाजूला सारलं गेलं आहे. हे आक्रमक हिंदुत्व आयसिस, बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरुपासारखंच आहे”, अशा आशयाचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकाच्या पान क्रमांक ११३ वर हा उल्लेख करण्यात आलेला आहे. या मुद्द्यावरून सध्या वाद निर्माण झाला असून या पुस्तकावर आणि सलमान खुर्शिद यांच्यावर टीका केली जात आहे.

या मुद्द्यावरून भाजपाकडून खुर्शिद यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपा नेते अमित मालविय यांनी यासंदर्भात ट्वीट करून खुर्शिद यांना लक्ष्य केलं आहे. “काँग्रेसचे सलमान खुर्शिद त्यांच्या नवीन पुस्तकात म्हणतात हिंदुत्व हे आयसिस, बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांसारखं आहे. ज्यांनी मुस्लिम मतं मिळवण्याकरता भगवा दहशतवाद नावाच्या कल्पनेचा वापर केला, अशा पक्षाच्या सदस्याकडून अजून काय अपेक्षा ठेवता येऊ शकते?” असा सवाल मालवीय यांनी ट्वीटमध्ये केला आहे.

आपल्या ट्वीटमध्ये मालवीय यांनी वादात सापडलेल्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’ पुस्तकातल्या त्या उल्लेखाचा फोटो देखील ट्वीट केला आहे.

खुर्शिद यांच्याविरोधात तक्रार दाखल

दरम्यान, सलमान खुर्शिद यांच्याविरोधात दिल्लीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्लीस्थित वकील विवेक गर्ग यांनी ही तक्रार दाखल केली आहे. “हिंदुत्वाची तुलना दहशतवादाशी करून खुर्शिद यांनी हिंदुत्वाची प्रतिमा मलीन केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा”, अशी मागणी त्यांनी केली आहे.