scorecardresearch

खुर्शीद यांच्या पुस्तकावरून राजकीय रणकंदन ; काँग्रेस हिंदूविरोधी असल्याचा भाजपचा आरोप,

काँग्रेस पक्ष हिंदू समाजविरोधी असून त्यांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कुटिल डाव खेळला जात असल्याचा आरोपही भाजपने केला.

खुर्शीद यांच्या पुस्तकावरून राजकीय रणकंदन ; काँग्रेस हिंदूविरोधी असल्याचा भाजपचा आरोप,

‘आयसिस’-‘बोको हराम’च्या तुलनेमुळे सत्ताधारी संतप्त

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात, सद्य:स्थितीतील हिंदुत्वाची तुलना ‘आयसिस’ व ‘बोको हराम’ या दहशवादी संघटनांच्या जिहादी विचारांशी केल्यामुळे राजकीय रणकंदन सुरू झाले आहे. काँग्रेस पक्ष हिंदू समाजविरोधी असून त्यांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कुटिल डाव खेळला जात असल्याचा आरोपही भाजपने केला.

‘सध्याच्या आक्रमक राजकीय हिंदुत्वाने साधू-संतांच्या पूर्वापार आणि प्राचीन हिंदू परंपरेला बाजूला केले आहे. आत्ताचे हिंदुत्व हे ‘आयसिस’ व ‘बोको हराम’ या इस्लामिक संघटनांप्रमाणे जिहादी प्रवृत्तीचे आहे’, अशी वादग्रस्त टिप्पणी खुर्शीद यांनी ‘सनराइज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकात केली आहे. या पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन झाले. या टिप्पणीवर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. हिंदू समाज सहिष्णू असून त्याची तुलना ‘आयसिस’ आणि ‘बोको हराम’शी करणे योग्य आहे का? हिंदूंच्या विरोधात विष पेरणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या विधानांना काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचा पाठिंबा आहे का? खुर्शीद तसेच हिंदूविरोधी विधाने करणाऱ्या नेत्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी का केली जात नाही? या वादावर सोनिया यांनी अजून मौन का बाळगले आहे, अशी प्रश्नांची सरबत्ती भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. हिंदुधर्मीयांच्या भावना दुखावल्या व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याप्रकरणी खुर्शीद यांच्याविरोधात विवेक गर्ग व विनित जिंदल या वकिलांनी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे.

हिंदूविरोधी राजकारणाचा आरोप

दहशतवादी विचारांशी हिंदुत्वाची तुलना करण्याची भूमिका सलमान खुर्शीद, पी. चिदंबरम, शशी थरूर, मणिशंकर अय्यर अशा नेत्यांपुरती सीमित नाही, तर संपूर्ण काँग्रेस पक्षाचीच विचारसरणी आहे. या देशाला अखंड ठेवण्यात इथल्या बहुसंख्याकांनी मोठे योगदान दिले आहे, पण त्यांच्या भावना पायदळी तुडवल्या जात आहेत. हे सगळे सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या आदेशानुसार होत आहे. काँग्रेसने मुस्लीम तुष्टीकरणासाठी ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द तयार केला होता. आता उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक असून राहुल व प्रियंका हे दोघे तिथे गल्ल्यागल्ल्यांत जाऊन हिंदू धर्म आणि हिंदुत्व म्हणजे ‘बोको हराम’ असल्याचे लोकांना सांगण्याचे धाडस दाखवतील का, असे भाटिया म्हणाले.

हिंदूत्व-हिंदूवाद वेगवेगळा – दिग्विजय सिंह

खुर्शीद यांनी पुस्तकात राम मंदिर वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे. त्याच्या संदर्भात, मुघलांच्या आणि ब्रिटिशांच्या आक्रमणानंतरदेखील हिंदू धर्म टिकून राहिला, आक्रमकांकडून हिंदू धर्माला कोणताही धोका निर्माण झालेला नव्हता, मग आता हिंदू धर्माचे अस्तित्व धोक्यात आल्याचे भाजप सातत्याने कशासाठी सांगत आहे, असा सवाल पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केला. हिंदुत्व आणि हिंदुवाद (हिंदुइझम) हे दोन्ही शब्द समानार्थी नाहीत. सावरकर धार्मिक नव्हते, त्यांनी गाईला माता कशाला म्हणता असा प्रश्न विचारला होता. पण, सावरकरांनी ‘हिंदुत्व’ शब्द प्रचलित करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला, असेही दिग्विजय सिंह म्हणाले.

काँग्रेस दुटप्पी – भाजप

काँग्रेस नेत्यांच्या हिंदुत्वावर केलेल्या विधानांवर भाजपने आक्षेप घेतला आहे. काँग्रेस पक्ष हिंदू समाजाविरोधात कोळ्याप्रमाणे जाळे विणत आहे. काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून बाहेर काढले गेले तर आता काय करणार, असे वक्तव्य खुर्शीद यांनी केले होते. सॅम पित्रोदा  १९८४ मधील दंगलीवर म्हणाले होते की, जे झाले ते झाले. हिंदू समाज प्रभू रामाचा भक्त असताना काँग्रेसच्या नेत्यांनी राम हे काल्पनिक पात्र असल्याचे विधान केले होते. हिंदू तालिबान असा शब्दप्रयोग थरूर यांनी केला होता, असे सांगत भाटिया म्हणाले की, इथल्या बहुसंख्याकांना संविधानाने समान अधिकार दिले असताना त्यांना काँग्रेस दुय्यम दर्जाचे नागरिक का मानतो, हा प्रश्न विचारला पाहिजे. या नेत्यांविरोधात बोलण्याचे धाडस सोनिया गांधी यांच्यामध्ये का नाही? निवडणुका आल्या की मंदिरांना भेटी द्यायच्या पण, हिंदू समाजाच्या भावना दुखावणाऱ्या नेत्यांविरोधात गप्प बसायचे, ही दुटप्पी भूमिका काँग्रेस का घेत आहे!

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-11-2021 at 02:30 IST

संबंधित बातम्या