पीटीआय, न्यूयॉर्क : भारतीय वंशाचे बुकर पुरस्कार विजेते प्रसिद्ध आणि वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांची प्रकृती अद्याप चिंतानजनक आहे. अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमात त्यांच्यावर एका व्यक्तीने प्राणघातक चाकूहल्ला केला होता. या वेळी त्याने रश्दी यांच्यावर अनेक वार केले. त्यामुळे रश्दी एक डोळा गमावण्याची भीती असून, त्यांच्या यकृताला गंभीर इजा झाली आहे. सध्या रश्दी यांना जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रश्दी यांच्या प्रतिनिधीने सांगितले, की त्यांच्या प्रकृतीविषयीचे वृत्त चांगले नाही. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने रश्दींचे प्रतिनिधी अँडर्य़ू वायली यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार रश्दी हे सध्या जीवनरक्षक प्रणालीवर असून, सध्या बोलू शकत नाहीत. त्यांच्या प्रकृतीविषयी प्रतिकूल वृत्त असून, त्यांना एक डोळा गमवावा लागेल, अशी भीती आहे. त्यांच्या हातांच्या काही नसा तुटल्या आहेत. तसेच यकृताला इजा पोहोचली आहे. जन्माने मुंबईकर असलेल्या रश्दी यांनी १९८८ मध्ये ‘द सॅटेनिक व्हर्सेस’ ही कादंबरी लिहिल्याने ते वादग्रस्त झाले. या कादंबरीमुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. काही मूलतत्त्ववाद्यांनी त्यांच्या हत्येची धमकी दिली होती. इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी सलमान रश्दी यांच्या या कादंबरीसाठी मृत्युदंडाचा फतवा प्रसृत केला होता.

न्यूयॉर्क राज्य पोलिसांचे मेजर युजिन स्टॅनिजेव्स्की यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले, की हल्लेखोर  सुमारे २४ वर्षांचा असून, हदी मतार असे त्याचे नाव आहे. तो न्यू जर्सी राज्यातील फेअरव्ह्यू येथील रहिवासी आहे. रश्दी शुक्रवारी एका कार्यक्रमात चौटाउक्वा संस्थेच्या व्यासपीठावर उपस्थित होते. त्या वेळी त्यांच्यावर हा हल्ला झाला. र्नैऋत्य न्यूयॉर्क राज्यातील चौटाउक्वा ही संघटना आहे. या संस्थेत नऊ आठवडय़ांच्या हंगामात सुमारे साडेसात हजार सदस्य मुक्कामाला येतात. येथे चौटाउक्वा व्याख्यानमालेत रश्दी बोलणार होते. निर्वासित लेखकांसह इतर कलाकारांसाठी आश्रय व सर्जनशील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे अमेरिका हे हक्काचे स्थान, या विषयावर विविध व्याख्यानपुष्पे गुंफली जाणार होती. ‘आश्रयस्थानापेक्षाही अधिक हक्काचे स्थान’ या विषयावर रश्दींचे व्याख्यान होते.

रश्दी यांच्यावर शस्त्रक्रिया

स्टॅनिजेव्स्की यांनी सांगितले, की घटनास्थळी तातडीने आपत्ती व्यवस्थापन पथकातील आरोग्य कर्मचारी होते. तोपर्यंत या कार्यक्रमात श्रोत्यांत उपस्थित एका डॉक्टरांनी रश्दींवर प्राथमिक उपचार सुरू केले होते. नंतर रश्दी यांना स्थानिक अतिदक्षता केंद्रात पोहोचवले गेले. स्थानिक वेळेनुसार सकाळी दहा वाजून ४७ मिनिटांनी झालेल्या या हल्ल्यानंतर अनेक तासांनी संध्याकाळी सुमारे पाच वाजता रश्दी यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली.

हल्लेखोर कोणत्या देशाचा?

हल्लेखोर मतार याच्या राष्ट्रीयत्वाविषयी विचारल्यावर स्टॅनिजेव्स्की यांनी सांगितले, की मला अद्याप त्याविषयी कोणतीही माहिती नाही. आम्ही त्याविषयी माहिती अद्ययावत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचे अधिकारी विविध वस्तूंचा तपास करण्यासाठी वॉरंट मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहेत. घटनास्थळावरून एक बॅग जप्त करण्यात आली आहे. त्यात विजेची उपकरणेही होती. सध्या, तरी आमचा कयास आहे, की हा हल्ला या हल्लेखोराने एकटय़ानेच केला. या हल्ल्यामागचा हेतू समजून घेण्यासाठी एफबीआय, शेरीफ कार्यालय समन्वयातून काम करत आहे.

हल्लेखोरास इराणच्या ‘रिव्हॉल्युशनरी गार्ड’विषयी सहानुभूती

न्यूयॉर्क : प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर चाकू हल्ला करणाऱ्या २४ वर्षीय हल्लेखोराचे नाव हदी मतार असून, शिया अतिरेकी आणि इराणच्या ‘इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड’विषयी त्याला सहानुभूती वाटते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार न्यूयॉर्क राज्याच्या पोलिसांनी मतार हा न्यू जर्सी येथील फेअरव्ह्यू येथील रहिवासी आहे. रश्दींवरील हल्ल्यामागील त्याचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.

नैर्ऋत्य न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमात रश्दी व्याख्यान देणार होते. त्या वेळीच हल्लेखोर पळत येऊन व्यासपीठावर चढला व त्याने रश्दींवर चाकूहल्ला केला. मतारच्या नागरिकत्व व त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास करण्यात येत आहे. ‘एनबीसी न्यूज’ने या प्रकरणाच्या तपासाची माहिती असलेल्या एका सूत्राच्या हवाल्याने बातमी दिली आहे, की मतारच्या समाजमाध्यम खात्यांवरील प्राथमिक तपासावरून तो ‘शिया अतिरेकी’ आणि ‘इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड’शी संबंधित माहिती मिळाली. त्यावरून तो त्याविषयी सहानुभूती ठेवून होता, हे निदर्शनास येते. परंतु, या संघटनांशी त्याचे थेट संबंध होते अथवा नाही, याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. इराणमध्ये मारला गेलेला कमांडर कासीम सुलेमानी आणि इराणी सरकारविषयी सहानुभूती असणाऱ्या एका इराकी अतिरेक्याचे छायाचित्र तपास अधिकाऱ्यांना मतारच्या मोबाइलफोनच्या मेसेजिंग अ‍ॅपवरून मिळाले. सुलेमानी हे वरिष्ठ इराणी लष्करी अधिकारी होते. त्यांची २०२० मध्ये हत्या करण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman rushdie condition critical stab injury liver fear losing sight ysh
First published on: 14-08-2022 at 00:02 IST