Brave Girl Attack : अवघ्या १७ वर्षीय मुलीनं तिच्या वडिलांवर होणारा हल्ला एकटीने जिकरीने थांबवला. या हल्लेखोरांकडे शस्त्र अन् बंदूका होत्या. तरीही ती डगमगली नाही. वडिलांचा जीव वाचावा म्हणून तिने तिच्या जीवाची पर्वा न करता हल्लेखोरांविरोधात लढा दिला अन् वडिलांचे प्राण वाचवले. छत्तीसगड येथे ही घटना घडली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मुलीच्या प्रतिहल्ल्यामुळे वडिलांचा जीव वाचला

सोमधर कोरम यांच्यावर हल्लेखोरांना हल्ला करायचा होता. ते एकूण ८ हल्लेखोर होते. त्यांच्या हातात शस्त्र आणि बंदुका होत्या. या हल्लेखोरांनी हातात कुऱ्हाड घेऊन घरात प्रवेश केला. नेमके तेवढ्यात त्यांची १७ वर्षीय मुलगी वडिलांना जेवण द्यायला घरात आली होती. आपले वडील हल्लेखोरांच्या तावडीत असल्याचं तिने पाहिलं. याबाबत ती म्हणाली, ते आठजण होते. त्यांनी दरवाजाला कडी लावून माझ्या वडिलांची भेट घेतली. मी हे दृश्य खिडकीतून पाहिलं. त्यांनी चेहऱ्यावर मास्क लावलेला होता. त्यांच्या हातात कुऱ्हाडी होती. तर, दोघांच्या हातात बंदुका होत्या. हे पाहताच मी तत्काळ कुऱ्हाड हातात असलेल्या हल्लेखोरावर वार केला आणि त्याच्याकडून शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. माझ्या या हालचालीमुळे टोळी अस्वस्थ झाली. त्यामुळे ते माझ्या वडिलांवर हल्ला करू शकले नाहीत”, असंही ती म्हणाली.

हेही वाचा >> Dadar Suitcase Murder : दादर सूटकेस हत्या प्रकरणाला नवं वळण, अर्शदच्या पत्नीचे मारेकऱ्याशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप

कुऱ्हाड मारणार तेवढ्यात…

“एका हल्लेखोराने त्याच्या हातातील कुऱ्हाड माझ्या वडिलांवर उगारली होती. ही कुऱ्हाड त्यांना लागणार तेवढ्यात मी त्यांचा वार झेलला. मला सेकंदभराचा उशीर झाला असता तर अनर्थ घडला असता. मी त्यांच्या हातातून कुऱ्हाड काढून घेतली आणि फेकून दिली”, अशीही आपबिती या अल्पवयीन मुलीने सांगितली. तिच्या या धाडसामुळे शेजारी सावध झाले. त्यांनी तत्काळ या हल्ल्यात हस्तक्षेप केला आणि हल्लेखोरांना पळवून लावलं.

माओवाद्यांचा सहभाग असल्याचा संशय

नारायणपूरचे पोलीस अधीक्षक प्रभात सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा तपास सुरू केला आहे. पीडित कुटुंबाला माओवाद्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे.