सौम्यरेन्द्र बरिक,एक्स्प्रेस वृत्त
नवी दिल्ली : सरकारे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कंपन्यांमधील जवळचे सहकार्य काळानुसार अधिकाधिक महत्त्वाचे ठरणार असल्याचे ‘ओपन एआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांनी शुक्रवारी ‘एक्स्प्रेस अड्डा’ कार्यक्रमात सांगितले़ तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करणे आणि मजबूत पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे आहे. भारताची अर्थव्यवस्था मोठी असल्याने देशाने ऊर्जा व पायाभूत सुविधा, चिप्स, फ्रंटियर मॉडेल्स आणि अनुप्रयोग अशा एआय स्टॅकच्या सर्व स्तरांवर काम करावे, असेही त्यांनी नमूद केले.
ऑल्टमन हे भारतात एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सहभागी होण्यासाठी आले आहेत. या वेळी त्यांच्या संस्थेने टाटा कन्सल्टन्सी स्व्हिहसेसबरोबर विदा केंद्र (डेटा सेंटर) करारासह अनेक भागीदारी जाहीर केल्या असून बेंगळुरू आणि मुंबई येथे नवीन कार्यालये सुरू करण्याची योजनाही व्यक्त केली.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांच्याबरोबर ‘एक्स्प्रेस अड्डा’ कार्यक्रमात संवाद साधताना ऑल्टमन यांनी एआयचा जागतिक प्रभाव, शक्तिसंतुलन, तांत्रिक बदल आणि चीनची भूमिका अशा विविध मुद्द्यांवर स्पष्टपणे मते मांडली.
चॅट जीपीटीला काही मुले एआय गृहपाठासाठी जवळचा मार्ग (शॉर्टकट) म्हणून वापरतील तर काही त्यातून नवीन शोध घेतील, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. २०१५ मध्ये ओपन एआयची सह-स्थापना केलेल्या ऑल्टमन यांनी एआय आणि सत्ताकेंद्रे तसेच जागतिक राजकारणातील त्याची भूमिका यावरही भाष्य केले.
सिलिकॉन व्हॅली आणि अमेरिकेच्या प्रशासनातील संबंधांबाबत ते म्हणाले की, काही बाबतीत संबंध जवळचे आहेत तर काही बाबतीत टीकाही झाली आहे. मात्र एआयचा समाजावर वाढता प्रभाव लक्षात घेता सरकारे आणि तंत्रज्ञान कंपन्यांचे सहकार्य अनिवार्य ठरणार आहे. ‘एआय जगातील महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांपैकी एक बनेल,’ असे त्यांनी सांगितले.
भारताने एआय स्टॅकमधील कोणत्या स्तरांना प्राधान्य द्यावे, या प्रश्नावर त्यांनी देशाने सर्व स्तरांवर सक्रिय भूमिका बजावावी असे स्पष्ट केले. जागतिक नेते आणि धोरणकर्त्यांशी संवादात पायाभूत सुविधा, रोजगार, एआयच्या फायद्यांचे न्याय्य वितरण आणि सुरक्षेबाबत सातत्याने चर्चा होत असल्याचे त्यांनी नमूद केले. रोजगारांवरील परिणामाबाबत ते म्हणाले की औद्योगिक क्रांतीदरम्यान रोजगाराबाबत भीती व्यक्त झाली होती, पण ती चुकीची ठरली.
भविष्यात कोणती कामे उदयास येतील याचा अचूक अंदाज बांधणे कठीण असल्याचे सांगताना त्यांनी काही नेहमी महत्त्वाची राहणारी कौशल्ये अधोरेखित केली. त्यात एआय साधनांचे प्रभुत्व, लवचिकता व जुळवून घेण्याची क्षमता, लोकांच्या गरजा ओळखून उपयोगी ठरण्याची वृत्ती, संघभावना व सहकार्य या कौशल्यांचा समावेश आहे.
