मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दिल्लीत इंडिया आघाडीने मोठा मोर्चा काढला आहे. काही खासदार रस्त्यावर ठिय्या करण्यासाठी पोहोचले आहेत. इंडिया आघाडीचे नेते उपस्थित आहेत. दिल्लीत या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. लोकशाही वाचवा, ज्ञानेश कुमारांना हटवा, अशा घोषणा दिल्या जात आहेत. आता पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही, असे स्पष्ट विरोधकांनी केले. दरम्यान समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चनही या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. आम्हाला गणेशजी मदत करत आहेत असं संबित पात्रा यांनी म्हटलं होतं. त्याबाबत विचारलं असता जया बच्चन यांनी आपल्या खास शैलीत भाजपाला टोला लगावला आहे.
सपा खासदार जया बच्चन काय म्हणाल्या?
जया बच्चन यांच्याशी जेव्हा माध्यमांनी संवाद साधला त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही किती चालणार? त्यावर, जोपर्यंत माझे पाय चालतात, पाय साथ देतात, तोपर्यंत मी चालत जाईन, असं जया बच्चन म्हणाल्या. ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे असं त्या म्हणाल्या. मग संबित पात्रांबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या भाजपाचं कामच आरोप नाकारणं आहे. आरोप चुकीचे असल्याचं सांगणं आहे. पण आमचं जे काम आहे, ते आम्ही करत आहोत. भगवान गणेश चुकीच्या कामांना मदत करत नाहीत. आम्ही गणेशाकडे प्रार्थना करतोय. ते आमचं रक्षण करतील. आम्ही गणेशाच्या पूजेपासूनच शुभारंभ करत असतो. आता तेच आमच्या पाठिशी आहेत. या आशयाचं वक्तव्य जया बच्चन यांनी केलं आहे.
संबित पात्रा काय म्हणाले होते?
संबित पात्रा म्हणाले, “भाजपाची मदत ज्ञानेशजी नाही, तर गणेशजी करत आहेत. गणेशजी बुद्धी, विद्या, ज्ञान आणि विवेकाचे देव आहेत.” भारताच्या जनतेकडे बुद्धी, ज्ञान आणि विवेक असून, कोणाला मतदान करायचे हे जनतेला चांगलेच माहीत आहे, असेही ते म्हणाले. कुटुंबवाद, भ्रष्टाचार आणि दहशतवाद्यांच्या समर्थनावरूनही पात्रांनी काँग्रेसवर टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशा राजकारणाला जनता मतदान करणार नाही.
इंडिया आघाडीच्या खासदारांचा दिल्लीत मोर्चा
दिल्लीत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेपासून भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत एका निषेध मार्चची सुरुवात केली. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेत मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप करत हा मोर्चा काढण्यात आला आहे. ‘एसआयआर’ आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, भाजपाने विरोधकांच्या या आंदोलनावर टीका केली आहे. निवडणूक आयोगासारख्या महत्त्वाच्या आणि घटनात्मक संस्थेवर दबाव आणण्याचा विरोधक प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजपाने केला आहे.
