Samajwadi Party potato protest: शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा या मागणीसाठी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी मंगळवारी संसदेबाहेर ‘बटाटा आंदोलन’ केले. समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या आवारात बटाटे आणून निषेध नोंदवला. त्यांनी “आलू का उचित मूल्य दिलाओ, किसानों को यूं न सताओ” (बटाट्याला योग्य भाव द्या, शेतकऱ्यांना त्रास देऊ नका) असे लिहिलेले बॅनर हातात घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
दरम्यान, आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषोन्नती योजना आणि प्रधानमंत्री-धन धान्य कृषी योजनेच्या पुनर्रचनेबाबतच्या प्रश्नांना उत्तरे दिली. निवडणूक आयोगावर ‘मत चोरी’ केल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रश्नोत्तराच्या तासात सतत घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
ओम बिर्लांविरोधात अविश्वास प्रस्ताव
दरम्यान, सभागृहाचे कामकाज सुरळीत चालल्यास लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी विरोधी पक्ष ठराव मांडेल, असे काँग्रेस खासदार के. सुरेश यांनी सांगितले. त्यानंतर बिर्ला यांच्याविरोधात अखेर अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी १० तासांचा वेळ देण्यात आला आहे.
११८ खासदारांच्या अविश्वास प्रस्तावावर सह्या
सोमवारी (९ मार्च) सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब होत असल्याने कनिष्ठ सभागृहात ठराव मांडता आला नाही, असे काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांनी सांगितले. त्यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, “जर सभागृह सुरळीत चालले तर आज आम्ही हा प्रस्ताव मांडू. काल सभागृहाचे कामकाजच झाले नाही.” विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलू दिले नाही, असा आरोप करत सभापतींनी पक्षपाती वर्तन केल्याचे सांगत ११८ विरोधी खासदारांनी या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
चर्चेसाठी १० तासांचा वेळ
अध्यक्षस्थानी असलेल्या भाजपचे खासदार जगदंबिका पाल यांनी सदस्यांना कळवले की, ठरावावरील चर्चेसाठी १० तासांचा वेळ देण्यात आला आहे. त्यांनी खासदारांना आपले भाषण केवळ प्रस्तावाच्या विषयापुरते मर्यादित ठेवण्याचे आणि वेळेचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच, सभापतींनी विरोधकांना ठराव मांडण्याची परवानगी देऊन चर्चेची प्रक्रिया सुलभ करण्यात उदारता दाखवली असल्याचेही पाल यांनी नमूद केले.
