समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांचे कौतुक करताना मोहम्मद अली जिना यांचीही त्यांच्याशी तुलना केल्याने भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त रविवारी अखिलेश यांनी भाषणात पटेल यांच्यासह पंडित नेहरू व महात्मा गांधी तसेच पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांना उल्लेख एकाच संदर्भाने केल्याने वाद सुरू झाला आहे. हरदोई येथील सभेत अखिलेश यांनी हे वक्तव्य केले. सरदार पटेल यांनी परिस्थितीवर आधारित निर्णय घेतल्याने ते पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाऊ लागले असा उल्लेख अखिलेश यांनी केला. सरदार पटेल, राष्ट्रपिता महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना एकाच संस्थेत शिकले आणि बॅरिस्टर पदवी संपादन केली. त्यातून देशाला स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली, या अखिलेश यांच्या वक्तव्यावरून वाद सुरू झाला आहे. भाषणात अखिलेश यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजप सरदार पटेल यांचा वारसा सांगतो मग तीन कृषी कायदे का मागे घेत नाही, असा सवाल यादव यांनी केला.

अखिलेश  विधानसभा लढणार नाहीत

पुढील वर्षी होणारी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचे अखिलेश यादव यांनी जाहीर केले आहे. अखिलेश हे आझमगडचे खासदार असून समाजवादी पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. राष्ट्रीय लोकदलाशी समाजवादी पक्षाची आघाडी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवपाल यादव यांच्या प्रगतिशील समाजवादी पक्षाशी आघाडीबाबत विचारले असता आमच्या बाजूने कोणतीही समस्या नाही असे उत्तर अखिलेश यांनी दिले. शिवपाल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल, असे अखिलेश यांनी स्पष्ट केले. शिवपाल हे अखिलेश यांचे काका आहेत.

योगींचे टीकास्त्र

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांच्यावर जिनांबाबतच्या वक्तव्यावरून टीका केली आहे. समाज तोडण्याची ही तालिबानी मानसिकता आहे, असा टोला योगींनी लगावला आहे. अखिलेश यांनी माफी मागावी अशी मागणी योगींनी केली आहे.