Samay Raina Net Worth and Income Sources: ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमधील वादग्रस्त विधानांमुळे समय रैना, रणवीर अलाहाबादिया हे एंटरटेनर गेल्या वर्षी वादात अडकले होते. यानंतर १४ महिन्यांनी समय रैनाने पुन्हा एकदा स्टँडअपच्या माध्यमातून सोशल मीडियावर पदार्पण केले आहे. युट्यूबवर त्याने Still Alive Samay Raina नावाने एक शो पब्लिश केला आहे. या शोमध्ये त्यांनी मगच्या वर्षभरातील घटनांवर त्याच्यापद्धतीने भाष्य केले आहे. याही शोमध्ये त्यांनी काही वादग्रस्त विधाने केली आहेत. ज्यामुळे त्याच्या शोची चर्चा आहे.

मागच्या वर्षी जेव्हा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोचा वाद उद्भवला तेव्हा समय रैना अमेरिकेत त्याच्या शोसाठी दौऱ्यावर गेला होता. जर हा दौरा अर्धवट सोडावा लागला तर आपल्याला किती नुकसान होऊ शकते, असा प्रश्न त्यावेळी समयने आपल्या टीमला विचारला. तेव्हा त्यांनी सांगितले की, जवळपास आठ कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. याचा उल्लेख त्याने नुकत्याच शोमध्ये केला. यामुळे समय रैनाची कमाई आणि संपत्ती किती? याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

समय रैनाची संपत्ती किती?

नेट वर्थ स्पॉटच्या अंदाजानुसार, समय रैनाची एकूण संपत्ती १५० कोटी असल्याचे सांगितले जाते. तथापि, समयच्या उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत. हे लक्षात घेता त्याची संपत्ती २१५ कोटी रुपयांच्याही पुढे असू शकते, असाही एक अंदाज वर्तवला जात आहे.

नेट वर्थ स्पॉटच्या माहितीनुसार, युट्यूबवरील समयच्या कंटेटला दरमहा ६८.७ दशलक्षहून अधिक व्ह्यूज मिळतात. याच्या जाहिरातींमधून त्याला जवळपास ३८ ते ६८ कोटींची कमाई होत असल्याचे सांगितले जाते. ही कमाई व्हिडीओंना मिळणारी ऐगेंजमेंट आणि महसूलावर आधारित असते.

समयने संपत्ती कशी निर्माण केली?

स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून समयने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. कॉमिकस्तानच्या दुसऱ्या भागाचा विजेता ठरल्यानंतर त्याला ओळख मिळाली. करोना महामारीच्या काळात समयने युट्यूबवर बुद्धिबळाचे स्ट्रीमिंग सुरू केले, या व्हिडीओंनीही त्याला चांगली ओळख मिळवून दिली.

खेळाबरोबरच विनोदाची फोडणी अशी वेगळी शैली समयने विकसित केली होती. नामांकित बुद्धिबळपटू, कॉमेडियन आणि क्रिएटर्सशी संधान बांधून त्याने अनेक व्हिडीओज तयार केले होते. यानंतर कॉमेडियन ऑन बोर्ड आणि इंडियाज गॉट लेटेंट या शो मुळे समयच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. जेन झी पिढीत समयची चांगलीच क्रेझ होती.

कमाईची महत्त्वाची साधने?

  • स्टँडअप शो हा समयच्या कमाईचे मुख्य साधन आहे. संपूर्ण भारत आणि विदेशात तो हे शो करत असतो. तिकीट विक्री आणि स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून तो पैसे कमावतो.
  • ८२ लाख सबस्क्राइबर्स असलेल्या त्याच्या चॅनेललला जाहिराती, सदस्यत्व आणि लाईव्ह स्ट्रिममधून पैसे मिळतात.
  • इतर डिजिटल क्रिएटर्सप्रमाणे समयदेखील ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडिया पार्टनरशिपमधूनही पैसे कमवतो.

आलिशान गाड्या आणि उंची जीवनशैली

मागच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर समयने टोयोटा वेल्फायर ही आलिशान गाडी खरेदी केली होती. या प्रीमियम गाडीची किंमत १.२२ कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.