मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि ‘एसआयआर’ मुद्यावरून विरोधकांनी आज निवडणूक आयोगाच्या दिशेने मोर्चाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि संबित पात्र यांनी, भाजपाला ज्ञानेश कुमार यांची नव्हे तर भगवान गणेशाची मदत होत असल्याचे म्हटले.

‘ज्ञानेशजी नाही, गणेशजी मदत करत आहेत’

संबित पात्र म्हणाले, “भाजपाची मदत ज्ञानेशजी नाही, तर गणेशजी करत आहेत. गणेशजी बुद्धी, विद्या, ज्ञान आणि विवेकाचे देव आहेत.” भारताच्या जनतेकडे बुद्धी, ज्ञान आणि विवेक असून, कोणाला मतदान करायचे हे जनतेला चांगलेच माहीत आहे, असेही ते म्हणाले. कुटुंबवाद, भ्रष्टाचार आणि दहशतवाद्यांच्या समर्थनावरूनही पात्रांनी काँग्रेसवर टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशा राजकारणाला जनता मतदान करणार नाही.

‘कॅप्टन स्मितसाठी ट्विटही करू शकत नाहीत’

यावेळी पात्रांनी कॅप्टन स्मित यांचा उल्लेख करत, “जे लोक कॅप्टन स्मित यांच्यासाठी एक ट्विटही करू शकत नाहीत, त्यांना मतदान करायचे नाही,” असे ते म्हणाले. त्याऐवजी ‘मी देश झुकू देणार नाही’ असे म्हणणाऱ्याला जनता मतदान करेल, असेही त्यांनी सांगितले.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान, नवी दिल्लीत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेपासून भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत एका निषेध मार्चची सुरुवात केली. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेत मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप करत हा मोर्चा काढण्यात आला आहे. ‘एसआयआर’ आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

दरम्यान, भाजपाने विरोधकांच्या या आंदोलनावर टीका केली आहे. निवडणूक आयोगासारख्या महत्त्वाच्या आणि घटनात्मक संस्थेवर दबाव आणण्याचा विरोधक प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजपाने केला आहे.

‘एसआयआर’वरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, आजचा इंडिया आघाडीचा मोर्चा महत्त्वाचा मानला जात आहे. मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण, निवडणूक आयोगाची भूमिका आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.