मुंबईत क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात अभिनेता शहारुख खान यांचा मुलगा आर्यन याला अटक करणारे अंमली पदार्थ विरोधी पथक मुंबईचे (एनसीबी) विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून अखेर या प्रकरणासह राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही तपास काढून घेण्यात आला आहे. आता या प्रकरणांचा तपास वरिष्ठ अधिकारी संजय सिंह करणार आहेत. मात्र या बातमीनंतर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणावरुन हटवण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. याचसंदर्भात आता वानखेडेंची आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने खुलासा करत चुकीच्या माहितीला बळी पडू नका असं म्हणत एनसीबीने जारी केलेलं पत्रकच ट्विटरवरुन शेअर केले आहे. समीर यांना हटवण्यात आलेलं नाही असा दावा क्रांतीने केलाय.

क्रांतीने शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास ट्विटरवरुन एनसीबीने ५ नोव्हेंबर २०२१ रोजी जारी केलेलं प्रसिद्धीपत्रक शेअर केलं आहे. “अफवांना बळी पडू नका. हे पाहा एनसीबीने जारी केलेलं अधिकृत पत्रक,” असं म्हणत या पत्रकाचा फोटो शेअर केलाय. या पत्रकामधील काही ओळखी अधोरेखित करण्यात आल्यात.

“कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा अधिकाऱ्यांना त्यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या सध्याच्या जबाबदारीवरुन (प्रकरणावरुन) हटवण्यात आलेलं नाही. ते अधिकारी ऑप्रेशन ब्रँचला तपासात सहकार्य करतील, जोपर्यंत पुढील काही आदेश दिला जात नाही,” असं या पत्रकात नमूद करण्यात आल्याचं क्रांतीने दर्शवलं आहे. तसेच या पत्रकामध्ये संपूर्ण देशात एनसीबी एक संस्था म्हणून काम करत असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.

वानखेडे काय म्हणाले?
दरम्यान, या प्रकरणात होणारे आरोप लक्षात घेता मीच स्वत: आपल्याकडून हा तपास काढून घ्यावा,अशी मागणी वरिष्ठांकडे केली होती,असा दावा समीर वानखेडे यांनी केला आहे. माझी बदली झाली नाही. मी अद्याप विभागीय संचालक पदावर कायम आहे. फक्त ६ प्रकरणांचा तपास दिल्लीतील अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. त्यात आर्यन खान व समीर खान प्रकरणांचाही समावेश आहे, असं वानखेडे म्हणाले.

नव्या निर्णयाने काय फरक पडणार?
एनसीबीने मुंबई विभागीय कार्यालयांकडून ६ प्रकरणे सेंट्रल युनिटकडे हस्तांतरित केली. ही सर्व प्रकरणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत आणि त्यात आंतरराज्यीय संबंध गुंतलेले आहेत. यात अरमान कोहीली आणि आर्यन खानसह नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. दरम्यान, वानखेडे यांच्याकडून सहा प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला असला तरी ते मुंबई एनसीबीचे विभागीय अधिकारी या पदावर कायम राहणार आहेत.  मात्र त्यांना आता नवीन  कारवाईसाठी दिल्ली एनसीबीच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.