पीटीआय, पाटणा
भाजप नेते सम्राट चौधरी यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची बुधवारी शपथ घेतली. राज्याचे ते २४ वे मुख्यमंत्री असून, भाजपकडे पहिल्यांदाच हे पद आले आहे. लोकभवन येथे राज्यपाल सईद अता हसनिन यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी संयुक्त जनता दलाचे बिजेंद्र प्रसाद यादव आणि विजय कुमार चौधरी यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. नव्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री असतील.

यावेळी जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार, भाजपचे माजी अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौधरी यांचे अभिनंदन केले आहे. समर्पित भावनेने काम करणारे व्यक्तीमत्व असल्याने राज्याला त्याचा फायदा होईल असे पंतप्रधानांनी नमूद केले. मावळते मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी चौधरी यांचे अभिनंदन करत, बिहारचा वेगाने विकास होईल असा विश्वास व्यक्त केला. ही परमेश्वराची कृपा आहे अशी भावना सम्राट चौधरी यांचे वडिल शकुनी चौधरी यांनी शपथविधीनंतर व्यक्त केली. शकुनी चौधरी हे सात वेळा आमदार होते. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी सम्राट चौधरी यांचे अभिनंदन करताना, नितीश कुमार यांना सत्तेतून बाजूला करण्याची प्रतीज्ञा घेतली होती ती पूर्ण झाली असा टोला लगावला. तसेच राज्यात रालोआची २१ वर्षे सत्ता असताना देखील अपेक्षित विकास झाला नाही हे वास्तव नव्या मुख्यमंत्र्यांना माहित आहे असेही तेजस्वी यांनी स्पष्ट केले.

जातीय समीकरणे महत्त्वाची

गेली तीन दशके राजकारणात असलेल्या ५७ वर्षीय सम्राट चौधरी यांनी ९ वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. तर दोन्ही उपमुख्यमंत्री हे नितीशकुमार यांचे विश्वासू मानले जातात. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच केला जाईल असे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सुत्रांनी सांगितले. त्यात जातीय समीकरणे महत्त्वाची ठरतील. मुख्यमंत्री चौधरी हे इतर मागासवर्गीय असलेल्या कोयरी समुदायातून येतात. तर विजयकुमार चौधरी हे खुल्या गटातील भुमीहार समूदायाचे प्रतिनिधीत्व करतात. दुसरे उपमुख्यमंत्री असलेले ब्रिजेंद्र प्रसाद यादव हे राज्यात इतर मागासवर्गीय समुदायातील सर्वात मोठा जातसमुह असलेल्या यादव समुदायातून येतात. मंत्रिमंडळात कुर्मी तसेच मुस्लिमांना प्रतिनिधीत्व दिले जाईल असे जनता दलाच्या नेत्याने नमूद केले.

आजपासूनच कामाला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व नितीश कुमार यांनी सुशासनाचे जे प्रारुप घालून दिले आहे त्यानुसारच वाटचाल केली जाईल. -सम्राट चौधरी, मुख्यमंत्री, बिहार