Samrat Choudhary Bihar New CM: बिहारच्या राजकारणातील एका पर्वाचा समारोप होऊन आज नव्या पर्वाची सुरुवात झाली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर केला. यानंतर बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपाचे सरकार स्थापन होणार आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर, सम्राट चौधरी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री असतील हे आता निश्चित झाले आहे. भाजपाच्या विधिमंडळ बैठकीत सम्राट चौधरी यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सम्राट चौधरी
सम्राट चौधरी यांची भाजपाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली आहे. सम्राट चौधरी माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत होते. भाजपाने नितीश यांचा राजीनामा झाल्यानंतर चौधरी यांची नेदेपदी निवड करुन राज्याची जबाबदारी त्यांच्या हाती सोपवल्याचे जवळपास निश्चित केले आहे. सम्राट चौधरी उद्या म्हणजेच बुधवारी (१५ एप्रिल) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
निवडीनंतर काय म्हणाले चौधरी?
“तुमच्या मार्गदर्शनाखाली बिहार विकासाच्या दिशेने प्रगती करत राहील, असा आम्हाला विश्वास आहे. तुमचा यशस्वी कार्यकाळ आणि सुशासन प्रेरणादायी आहे”, अशी प्रतिक्रिया सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर दिली आहे. तसेच, “नितीश कुमार यांनी प्रशासनाची शिकवण दिली आहे ती शिकवण नेहमी लक्षात ठेवण्याचा आणि त्यावर चालण्याचा मी प्रयत्न करेन”, असे चौधरी यांनी भाजपाच्या विधिमंडळ नेदेपदी निवड झाल्यानंतर सांगितले.
उद्याच होणार शपथविधी?
सम्राट चौधरी बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सम्राट चौधरी यांनी ९० च्या दशकात राजकीय प्रवासाला सुरुवात केली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आलेले नाहीत, तसेच त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही भाजपामधून केलेली नाही. नितीश कुमार यांना त्यांनी कधीकाळी कडवा विरोध केला होता. त्याच व्यक्तीच्या गळ्यात आज भाजपाने मुख्यमंत्रीपदाची माळ घातली आहे.
