सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आपल्या भात्यातील आणखी एक टॅब्लेट गुरुवारी भारतीय बाजारामध्ये सादर केला. गॅलक्सी टॅब ३ या नव्या टॅब्लेटची किंमत भारतीय बाजारामध्ये १७ ते ३६ हजारांच्या दरम्यान असेल. येत्या रविवारपासून हा टॅब्लेट ग्राहकांना दुकानातून विकत घेता येईल.
गॅलक्सी ३ हा टॅब्लेट तीन प्रकारांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. सात आणि आठ इंच स्क्रिनमध्ये तो उपलब्ध असेल. आठ इंचाचा स्क्रिन असलेला टॅब्लेट ३ जी पूरक आणि व्हायफाय पूरक अशा दोन प्रकारांमध्ये असेल. हे दोन्ही टॅब्लेट ग्राहकांना मोबाईल म्हणूनही वापरता येतील. या टॅब्लेटमध्ये १.५ गिगाहार्टझचा ड्युअर कोअर प्रोसेसर असून १.५ जीबीची रॅम आहे. या टॅब्लेटमध्ये १६ जीबीची अंतर्गत मेमरी असून, ती एसडी कार्डच्या साह्याने ६४ जीबींपर्यंत वाढविता येऊ शकते.
सात इंचाच्या गॅलक्सी टॅबमध्ये १.२ गिगाहार्टझचा ड्युअर कोअर प्रोसेसर आणि एक जीबीची रॅम असेल. यामध्ये तीन मेगापिक्सलचा रिअर तर १.३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. या टॅब्लेटमध्ये ८ जीबीची अंतर्गत मेमरी असून, ती एसडी कार्डच्या साह्याने ३२ जीबीपर्यंत वाढविता येऊ शकते.