आम आदमी पार्टीच्या सात खासदारांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केला. त्यानंतर या सातही खासदारांना भाजपा खासदार म्हणून राज्यसभेने मान्यताही दिली. या सात खासदारांमध्ये खासदार संदीप पाठक यांचाही समावेश आहे. मात्र, ‘आप’सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर काही दिवसांतच संदीप पाठक यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

संदीप पाठक यांच्या विरोधात पंजाबमध्ये दोन एफआयआर दाखल झाले आहेत. पंजाब पोलिसांनी दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये संदीप पाठक यांच्या विरोधात हे गुन्हे दाखल केले असून या एफआयआरमध्ये भ्रष्टाचार आणि महिलांचा छळ यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.

पाठक यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांच्यावर कधीही अटकेची कारवाई होऊ शकते. या सर्व घडामोडींवर आता खासदार पाठक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंजाब पोलिसांनी त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या एफआयआरबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच ‘आप’मधून भाजपात केलेल्या प्रवेशाबाबत बोलताना आता माझा मार्ग पूर्णपणे वेगळा असल्याचं पाठक यांनी म्हटलं आहे.

संदीप पाठक काय म्हणाले?

“पंजाब पोलिसांनी त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या एफआयआरबाबत मला कोणतीही माहिती नाही. मात्र, पंजाबमधील शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. एफआयआरची प्रत मला मिळाल्यानंतर मी त्यावर प्रतिक्रिया देईल. तोपर्यंत एफआयआरची प्रत मिळण्याची वाट पाहत आहे. अद्याप मला एफआयआरबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही”, असं संदीप पाठक यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त जनसत्ताने दिलं आहे.

‘माझा मार्ग पूर्णपणे वेगळा’

“राजकारणातील यश किंवा अपयश मला महत्त्वाचं वाटत नाही. आम आदमी पक्ष सोडण्याचा निर्णय कोणत्याही वैयक्तिक कारणांमुळे नसून विचारधारा आणि कार्यपद्धतीमधील दीर्घकाळापासूनच्या मतभेदांमुळे होता. पण आता माझा मार्ग पूर्णपणे वेगळा आहे”, असंही संदीप पाठक यांनी स्पष्ट केलं आहे.

संदीप पाठक कोण आहेत?

संदीप पाठक हे राज्यसभेचे खासदार आहेत. २०२२ मध्ये पंजाबमधून संदीप पाठक हे राज्यसभेत दाखल झाले होते. संदीप पाठक यांनी केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतलेलं आहे. संदीप पाठक यांनी २०२० च्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आणि २०२२ च्या पंजाब निवडणुकांच्या दरम्यान ‘आप’च्या महत्वाच्या रणनीतीत त्यांची महत्त्वाची भूमिका होती असं बोललं जातं.