scorecardresearch

संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील नऊ दिगज्जांचा सन्मान

संगीत नाटक अकादमीने गेल्या तीन वर्षांचे (२०१९, २०२० आणि २०२१) पुरस्कार शुक्रवारी जाहीर केले. त्यांत महाराष्ट्रातील नऊ मान्यवरांचा समावेश आहे.

संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील नऊ दिगज्जांचा सन्मान
संगीत नाटक अकादमीने गेल्या तीन वर्षांचे (२०१९, २०२० आणि २०२१) पुरस्कार शुक्रवारी जाहीर केले.

पीटीआय, नवी दिल्ली : संगीत नाटक अकादमीने गेल्या तीन वर्षांचे (२०१९, २०२० आणि २०२१) पुरस्कार शुक्रवारी जाहीर केले. त्यांत महाराष्ट्रातील नऊ मान्यवरांचा समावेश आहे. अकादमीने देशभरातील ७५ कलाकारांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानासाठी ‘संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार’ही जाहीर केला आहे. वयाचा अमृत महोत्सव साजरा केलेल्या कलाकारांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांत महाराष्ट्रातील  सहा कलाकारांचा समावेश आहे. 

अकादमीच्या पुरस्कारविजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील मालिनी राजुरकर (सहअध्यायी), आरती अंकलीकर-टिकेकर (हिंदूस्थानी शास्त्रीय गायन), प्रशांत दामले (अभिनय), उदय भवाळकर (हिंदूस्थानी शास्त्रीय गायन), शमा भाटे (नृत्य), पांडुरंग घोटकर (लोकसंगीत), माजिद गुलाबसाहेब सतारमेकर (वाद्यनिर्माण), नंदकिशोर कपोते (समग्र योगदान), मीना नायक (कळसूत्री बाहुल्या) यांचा समावेश आहे.

‘संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार’विजेत्यांमध्ये वयाचा अमृत महोत्सव साजरा केलेल्या सहा मराठी कलाकारांचा समावेश आहे. ज्या कलाकारांना त्यांच्या कारकिर्दीत कोणताही राष्ट्रीय सन्मान मिळाला नाही, अशा कलाकारांचा या राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात येणार असल्याचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने म्हटले आहे. या कलाकारांत आंध्र प्रदेशातील तीन, अरुणाचल प्रदेशातील दोन आणि महाराष्ट्रातील सहा कलाकारांचा यात समावेश आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश व पंजाबमधून प्रत्येकी तीन कलाकारांची निवड करण्यात आली आहे. बिहार, गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि मणिपूरमधील प्रत्येकी चार, तर कर्नाटक, आसाम, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू व केरळमधील प्रत्येकी पाच कलाकारांचा समावेश आहे.ताम्रपत्र, शाल आणि एक लाख रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार ही गुरुजनांकडून मिळालेली विद्या, परमेश्वरी कृपा आणि आई-वडिलांच्या कष्टाला मिळालेली दाद आहे. त्यामध्ये माझी मेहनत निमित्तमात्र आहे. श्रोत्यांची वेळोवेळी मिळालेली दाद यामुळे मी घडले. त्यामुळे हा पुरस्कार श्रोत्यांचाच आहे.

– आरती अंकलीकर-टिकेकर, प्रसिद्ध गायिका

कलेच्या माध्यमातून पुण्यात सुरू केलेले काम आता संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारामुळे देशाच्या पटलावर पोहोचवण्यास मदत होईल. या पुरस्कारामुळे माझ्या कलेला नवी ऊर्जा मिळाली आहे. गुरूंनी केलेल्या विद्यादानामुळे माझ्या कलेच्या कक्षा रुंदावत गेल्या. आता पुरस्काराच्या रूपाने माझी कला सरकार दरबारी पोचली आहे.

– शमा भाटे, ज्येष्ठ कथक नृत्यगुरू

गेल्या ५० वर्षांपासून निष्ठेने कलेची सेवा केली, त्याचे फळ संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराद्वारे लाभले आहे. माझ्या कलेचा शासन दरबारी झालेल्या सन्मानामुळे मी आनंदी आहे. आई-वडील, परिवार आणि माझे गुरुजी पं. बिरजू महाराज यांना मी या पुरस्काराचे श्रेय देतो. कलेचा सन्मान केल्याबद्दल शासनाचेही धन्यवाद.

– पं. नंदकिशोर कपोते, ज्येष्ठ कथक नृत्यगुरू.

गुरुपरंपरा, गुरूंकडून मिळालेले विद्यादान आणि आई-वडिलांचे आशीर्वाद यांना हा पुरस्कार समर्पित करतो. अभ्यास सोडून पूर्ण वेळ धृपद गायन कर, असे सांगून प्रोत्साहन देणारे आई-वडील लाभले हे माझे भाग्य आहे. ज्या बुजुर्ग कलाकारांना भेटण्याची संधी लाभली त्या सर्वानी मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले. त्या बळावरच ही वाटचाल सुरू आहे.

– पं. उदय भवाळकर, प्रसिद्ध धृपदगायक

७५ कलाकारांना अमृत पुरस्कार

– जम्मू-काश्मीरमधील क्रिशन लांगू (नाटय़ आणि संगीत)

– गोव्याचे जॉन क्लारो फर्नाडिस (नाटय़लेखन)

– झारखंडचे महावीर नायक (लोक संगीत आणि नृत्य)

– लडाखचे त्सेरिंग स्टॅन्झिन (लोकसंगीत)

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 01:04 IST

संबंधित बातम्या