Indian LPG Ship Strait of Hormuz Escape Viral Video: “२४ लाख सिलिंडर भरतील एवढा गॅस घेऊन होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडणे म्हणजे मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडण्यासारखे होते. पण, आम्ही सुखरुप बाहेर आलो”, असा अनुभव एलपीजी जहाजावर काम करणाऱ्या अजित खोतने सांगितला आहे. एलपीजी गॅसने भरलेले जहाज होर्मुझमधून बाहेर कसे पडले? हा अजित खोतचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चांगलाचा व्हायरल झालाय. अजित मूळ कवठे-महांकाळ, सांगलीचा रहिवासी आहे असे तो व्हिडीओत सांगतो. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे प्रभावित झालेल्या होर्मुझमधून गॅसने भरलेले जहाज घेऊन बाहेर पडणे किती आव्हानात्मक आणि भीतीदायक अनुभव होता याचे सहव्हिडीओ वर्णन अजित खोतने केले आहे.
दुबईत दहा दिवस थांबा
अजित खोतच्या इन्स्टाग्राम प्रोफाईवरील माहितीनुसार तो खलाशी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. “दुबईमध्ये दहा दिवस थांबल्यानंतर १३ मार्च रोजी सकाळी होर्मुझमधून जाण्यासाठी कंपनीच्या दोन जहाजांना परवानगी मिळाल्याचे सांगण्यात आले. याबाबत ई-मेल प्राप्त झाल्यानंतर जहाजावरील सर्वांनी याची कल्पना देण्यात आली. भारत सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर जहाज बाहेर घेऊन येण्यास आम्ही आवश्यक सर्व तयारी केली”, असे अजित व्हिडीओत सांगत आहे.
परवानगीनंतर होर्मुझच्या दिशेने प्रवास
“रात्री आठ वाजता कंपनीची परवानगी घेऊन आम्ही होर्मुझच्या दिशेने निघालो. पण, आमच्या जहाजावरील जीपीएस काम करत नव्हते. यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने मार्ग काढण्यात आला. अति धोकादायक भाग असल्याने तसेच, होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी १२ तासांचा वेळ लागणार असल्याने सर्वांच्या मनात भीती होती. जहाजावर सर्वजण एकमेकांना दिलासा देत होते”, असे अजित व्हिडीओत सांगतो आहे.
भारतीय नौदल आले मदतीला
१४ तासांच्या प्रवासानंतर भारतीय नौदलाचे दोन जहाज आमच्या सुरक्षेसाठी समुद्रात दाखल झाले होते. नौदलाचे जहाज पाहून सर्वांना दिलासा वाटल्याचे अजित म्हणाला. १७ मार्च पहाटे दोन वाजता जहाज गुजरात बंदरात दाखल झाले, असा अनुभव अजितने सांगितला. हा त्याचा होर्मुझमधून पहिलाच प्रवास असल्याचे तो व्हिडीओत सांगत आहे. अजितच्या या व्हिडीओला ४.३ मिलियन व्ह्यूज मिळाल्या असून, २ लाख ४१ हजार जणांनी या व्हिडीओला लाईक केले आहे.
दुबईत पोहोचल्यानंतर होर्मुझ बंद
अजितने यापूर्वी देखील एका व्हिडीओत दुबईत जहाज उभं असताना घडलेल्या घटनांची माहिती दिली आहे. “जहाजांत गॅस भरल्यानंतर आम्ही दुबईपर्यंत पोहोचल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली. पुढे जाण्याची परवानगी नसल्याने दुबईतच जहाजं उभं करावं लगालं. अजुबाजुच्या काही जहाजांवर हल्ला होत होता, हे आम्ही पाहत होतो पण आमचे जहाज सुखरुप होते”, असे अजितने यापूर्वी केलेल्या एका व्हिडीओत माहिती दिली. दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनीतून पहिल्यांदा शिवालिक गॅस वाहू जहाज बाहेर पडून १६ मार्च रोजी गुजरातमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर १७ मार्चला नंदादेवी जहाज आले होते.
