न्यायालयाने दिलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेचा फेरविचार करावा, यासाठी अभिनेता संजय दत्त याने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. यामुळे संजय दत्तला येत्या १६ मे पूर्वी शिक्षा भोगण्यासाठी न्यायालयापुढे शरण यावे लागणार आहे.
१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला दोषी ठरवून शस्त्रास्त्र कायद्याखाली पाच वर्षांची शिक्षा सुनावली. संजयने या अगोदर १८ महिन्यांची शिक्षा भोगली असल्यामुळे त्याला आणखी साडेतीन वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे. न्यायालयाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी संजय दत्तच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. न्या. पी. सथाशिवम आणि न्या. बी. एस. चौहान यांनी ही याचिका फेटाळली.
बंद खोलीमध्ये याप्रकरणी शुक्रवारी दुपारी सुनावणी झाली. याआधी न्यायालयाने याच स्वरुपाच्या फेरविचार याचिका फेटाळल्या आहेत. संजय दत्तने गेल्या १७ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि शिक्षेच्या अंमलबजावणीस सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यावेळी न्यायालायने त्याला थोडासा दिलासा देत शिक्षा भोगण्यास एक महिन्यांची मुदतवाढ दिली होती.