मंत्रिपद मिळालं नाही याबद्दल प्रतिक्रिया देताना निषाद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय निषाद म्हणाले, की अजून योग्य वेळ यायची आहे. यावेळी त्यांनी भाजपाला टोलाही लगवला आहे. कधीतरी कार्यकर्ताही मंत्री होईल, अशी वेळही येईल, असंही ते म्हणाले आहेत.

आजतकशी बोलताना निषाद म्हणाले, जर भारतीय जनता पार्टी एका चहावाल्याला पंतप्रधान बनवू शकते तर मलाही एखादं चांगलं पद नक्कीच मिळेल. त्यांनी सांगितलं की, त्यांचा लढा हा पद-प्रतिष्ठेसाठी नसून निषादांच्या भल्यासाठी आणि कायद्यांसाठी आहे. संसद हे एक उच्च सदन आहे जिथे कायदे बनवले जातात. जर भाजपाने मला तिथे पाठवले तर मी तिथे जाऊन निषादांच्या हिताचे कायदे बनवेन.

मंत्रिपदाविषयी भाष्य करताना ते म्हणाले की, योग्य वेळ येऊ द्या. जर भाजपा चहावाल्याला पंतप्रधान बनवू शकते तर मलाही पुढे नेईल. एका कार्यकर्त्याला मंत्री निश्चित बनवेल. आत्तापर्यंत आम्ही कायदे बनवण्यासाठी संघर्ष करत होतो, पण आता आम्ही स्वतःच कायदे तयार करु.
रविवारी योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखालील भाजपाचा सरकारमध्ये जितिन प्रसाद यांच्यासह सात नव्या मंत्र्यांना उत्तरप्रदेशच्या मंत्रिमंडळात सामील करुन घेण्यात आले. छत्रपाल सिंह, पलटु राम, संगीता बलवंत, संजीव कुमार, दिनेश खटीक आणि धर्मवीर सिंह यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे. संजय निषाद यांनाही मंत्रिपद देण्यात येईल अशा बातम्या येत होत्या, मात्र त्यांना मंत्री बनवण्यात आलं नाही.