Sanjay Raut on Delhi protest over the SIR controversy: SIR प्रकरणावरून सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं निवडणूक आयोगातल्याच इतर दोन निवडणूक आयुक्तांचा ज्ञानेश कुमारांनी एसआयआरसंदर्भात घेतलेल्या निर्णयाला कसा विरोध होता, हे सप्रमाण प्रकाशित केल्यानंतर त्यावरून देशभरात गदारोळ उठला. त्यानंतर CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टीनं आधी दिल्ली, मग मुंबई आणि नंतर पुन्हा दिल्लीत व्यापक आंदोलन केलं. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. या सर्व पार्श्वभूमीवर आता विरोधकांनी सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली असून ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी याबाबत एक सूचक पोस्ट केली आहे.
काय आहे संजय राऊतांच्या पोस्टमध्ये?
संजय राऊतांनी दिल्लीतली सध्याची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं म्हटलं आहे. “दिल्लीची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. मोदी-शहा वगैरेंची दहशत या पोरांनी नष्ट केली आहे. नेहा बोरा यांना ज्या गाडीत बंदिस्त केलं होतं, त्याच गाडीला पोरांनो खेळणं बनवून टाकलं! दिल्ली पोलीस पूर्णपणे हतबल झाले आहेत. विद्यार्थ्यांनी गाडी उलट्या दिशेनं पळवून नेली, पोलीस काहीच करू शकले नाहीत. किमान चार वेळा गाडी १०० मीटर पुढे आणि १०० मीटर मागे धावत राहिली”, अशा शब्दांत राऊतांनी सीजेपीच्या आंदोलनावरून मोदी सरकारला टोला लगावला आहे.
दरम्यान, या पोस्टमध्ये संजय राऊतांनी अमित शाह भूमिगत झाले असल्याची टीका केली. “अमित शाह भूमिगत आहेत. थांबा, आणखी बरंच काही बघायचं आहे!महाराष्ट्रत आज ट्रेलर दिसला आहे”, असं राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टसोबत राऊतांनी रविवारी दिल्लीत झालेल्या आंदोलनाचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून मध्यभागी एका गाडीला आंदोलकांनी अडवल्याचं दिसत आहे.
मुंबईपाठोपाठ दिल्लीत CJP चं आंदोलन
मुंबईत शिवाजी पार्क येथे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झाल्यानंतर पाठोपाठ रविवारी दिल्लीतदेखील पुन्हा एकदा जंतरमंतरवर CJP च्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केल्यानंतर त्यावरून मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. यावेळी AISA ची प्रमुख नेहा बोरा हिला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनस्थळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
नेहा बोराला घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीला आंदोलकांनी घेराव घातला. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना काही प्रमाणात बळाचादेखील वापर करावा लागला.
