scorecardresearch

“आता चित्रपटाच्या दिग्दर्शकाला पद्मश्री किंवा पद्मभूषण…”; ‘द कश्मीर फाइल्स’वरुन राऊतांचा भाजपावर निशाणा

आता पाकव्याप्त काश्मीर परत आणण्याचे वचन पूर्ण करा, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे

Sanjay Raut criticism of BJP from The Kashmir Files movie

बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहेत्री यांचा ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या वादावर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाष्य केले आहे. सातत्याने व्यक्तिस्वातंत्र्याचा झेंडा घेऊन उभी असलेली टोळी या चित्रपटाची बदनामी करत आहे, असा आरोप मोदींनी केला आहे. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरमध्ये अनेक वर्षांपासून काय झाले आहे ते आम्ही जवळून पाहिले आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

‘द कश्मीर फाइल्स’चा भाजपा आणि पंतप्रधानांकडून प्रचार

“अनेक चित्रपट येतात आणि त्यामध्ये कधी खोट्या कथाही दाखवल्या जातात. लोक ते पाहून विसरुन जातात. एका निर्मात्याने चित्रपट तयार केला आहे आणि त्यात अनेकांनी काम केले आहे. काश्मीरमध्ये अनेक वर्षांपासून काय झाले आहे ते आम्ही जवळून पाहिले आहे. त्यावर चित्रपट तयार करण्यात आला असून त्याचा राजकीय फायद्यासाठी लोक प्रयत्न करतील पण तो होणार नाही. पण त्यामध्ये सत्य लपवण्यात आले आहे आणि ते चित्रपटामध्ये यायला हवे होते. ‘द कश्मीर फाइल्स’चा भाजपा आणि पंतप्रधान प्रचार करत आहे. भाजपाचे समर्थक हा चित्रपट पाहणारच आहेत,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“काश्मीरची खरी फाईल काय आहे हे…”; The Kashmir Files चित्रपटावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

पाकव्याप्त काश्मीर परत आणण्याचे वचन पूर्ण करा

“या चित्रपटाला आता एखादा पुरस्कार देण्यात येईल. चित्रपटाच्या दिग्दर्शकाला पद्मश्री किंवा पद्मभूषण पुरस्कार देण्यात येईल. ज्या पद्धतीने देशात राजकारण सुरु आहे त्यामध्ये हे सर्व होणारच आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदू मुस्लीम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काश्मीरमध्ये हिंदू पंडितांना अत्याचाराला सामोरे जावे लागले. आतापर्यंत त्यांची घरवापसी झालेली नाही याचे आम्हाला दुःख आहे. काश्मिरी पंडितांच्या घरवापसचीचे वचन भाजपाने आणि पंतप्रधान मोदींनी दिले होते. ते आतापर्यंत पूर्ण का नाही झाले? काश्मीरचा विकास का नाही झाला? काश्मीरमधली बेरोजगारी का नाही गेली? फक्त हिंदू मुस्लीम अजेंड्यावर निवडणुका कधीपर्यंत जिंकणार आहात? काश्मीरच्या मुद्द्यावर राजकारण करणे योग्य नाही. हा खूपच संवेदनशील विषय आहे. आता पाकव्याप्त काश्मीर परत आणण्याचे वचन पूर्ण करा,” असे संजय राऊत म्हणाले.

विश्लेषण : काश्मिरी पंडितांची शोकांतिका

काश्मिरी पंडितांसोबत शिखांनी सुद्धा बलिदान दिले

“काश्मीर हा आपल्या देशासाठी आणि देशाच्या जनतेसाठी अत्यंत संवेदनशील असा विषय आहे. अनेक वर्ष देशात राजकारण सुरू आहे, आम्हाला वाटले होते की नरेंद्र मोदी आल्यानंतर ते थांबेल, पण ते वाढतच चालले आहे. कश्मीर फाइल्स मध्ये अनेक गोष्टी अशा आहेत, ज्या असत्य आहेत, ज्या घडलेल्या नाहीत. पण तो चित्रपट आहे, ज्यांना पाहायचा आहे ते पाहतील आणि ज्यांना खटकलं असेल ते बोलतील. तेवढे स्वातंत्र्य आपल्या देशात आहे. पण काश्मिरी पंडितांसोबत शिखांनी सुद्धा बलिदान दिले आहे. सुरक्षा दलातील मुस्लिम पोलिसांना देखील अतिरेक्यांनी मारले आहे. कश्मिरी पंडितही सांगतात की त्यांचे प्राण वाचवायला अनेकवेळा मुस्लिम अधिकारी आले होते,” असे संजय राऊत म्हणाले.

सावरकराचे स्वप्न पूर्ण झाल्याचे आम्हाला या जन्मात पाहता येईल

“सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाकव्याप्त काश्मीर पुन्हा हिंदुस्तानाला कधी जोडत आहात? जे वीर सावरकर यांचे स्वप्न होते ते पूर्ण झाल्याचे आम्हाला या जन्मात पाहता येईल. काश्मीरच्या बाबतीत तरी हे राजकारण होऊ नये. राम मंदिराचा मुद्दा संपला असे आम्ही मानतो, जर काश्मीरचा विषय कोणी काढत असेल तर ते कश्मीर या विषयाला पुन्हा एकदा विषाची उकळी देत आहेत, असे राऊत म्हणाले.

“शिवसेना कधीही हिंदुत्व विसरणार नाही आणि विसरलेली नाही. हिंदुत्व कोण विसरले याचे आत्मचिंतन भाजपाने करावे. हिंदुत्ववादी शिवसेनेला दगा कोणी दिला त्याचे चिंतन त्यांनीच केले पाहिजे. आम्ही आमच्या हिंदुत्वाशी पक्के आहोत आणि जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा हिंदुत्वासाठी हातात तलवार घ्यायला आम्ही तयार आहोत, असेही राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut criticism of bjp from the kashmir files movie abn

ताज्या बातम्या