scorecardresearch

“काश्मीरी पंडितांच्या घरवापसीचं काय झालं?”, संजय राऊतांचा मोदी सरकारला सवाल; म्हणाले, “ कलम ३७० रद्द केल्यानंतर… ”

संजय राऊत दोन दिवसीय जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असून आज त्यांनी जम्मूमध्ये पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

“काश्मीरी पंडितांच्या घरवापसीचं काय झालं?”, संजय राऊतांचा मोदी सरकारला सवाल; म्हणाले, “ कलम ३७० रद्द केल्यानंतर… ”
संजय राऊत (फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम)

भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने शिवसेना खासदार संजय राऊत दोन दिवसीय जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. काल ते राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. दरम्यान, आज त्यांनी जम्मूमध्ये पत्रकार परिषद घेत केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारने काश्मीरी पंडितांच्या घरवापसीचे आश्वासन दिले होते. मात्र, आजही काश्मीरी पंडितांचा आक्रोश कायम, असे ते म्हणाले. कलम ३७० रद्द करण्यावरूनही मोदी सरकारला लक्ष्य केलं.

हेही वाचा – Bharat Jodo Yatra:राहुल गांधींच्या भारत जोडोमध्ये Sanjay Raut सहभागी; जम्मूमध्ये जाऊन दिला पाठिंबा

काय म्हणाले संजय राऊत?

“२०१४ मध्ये मोदींनी जम्मू-काश्मीरमध्ये येऊन मतं मागितली होती. येथील जनतेने त्यांना मतंही दिली. मात्र, आज येथे अनेक प्रश्न कायम आहेत. येथील तरुण बेरोजगार आहेत. आज जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० नाही. मात्र, कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये उद्योग येतील, रोजगार वाढेल, काश्मीर पुन्हा एकदा स्वर्ग बनेल आदी आश्वासनं मोदी सरकारकडून देण्यात आली होती. पण आज इथे आल्यानंतर जेव्हा लोकांशी चर्चा केली तेव्हा इथे कुठेच स्वर्ग दिसला नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली. काश्मीरी पंडितांचा आक्रोश आजही कायम आहे. ते आजही स्वत:च्या घरी ज्यायला घाबरत आहेत. सत्तेत आल्यानंतर त्यांची घरवापसी केली जाईल, असं आश्वासन मोदी सरकारने दिलं होतं. त्याचं काय झालं? असा प्रश्नही त्यांनी मोदी सरकारला विचारला.

“काश्मीरचे ते प्रश्न आजही कायम”

“मी काल जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचलो, तेव्हा मला आश्चर्य वाटलं. काही वर्षांपूर्वी आपण जम्मू-काश्मीरच्या ज्या प्रश्नांवर आपण चर्चा करत होतो, तेच प्रश्न आजही कायम आहेत. यादरम्यान राज्यात आणि केंद्रात सरकारं बदलली. मात्र, काश्मीरी पंडित, कायदा सुव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद हे मुद्दे आजही कायम आहेत. गेल्या चार वर्षांपासून इथे राज्यपालांचे शासन आहे. निवडणुका झाल्या नाहीत. येथील मुख्ममंत्री निवास्थानही खाली आहे, तिथे काय होतं मला माहिती नाही”, अशी अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली.

हेही वाचा – मुंबईत करोना काळात मोठा घोटाळा? संदीप देशपांडेंच्या दाव्याने खळबळ, २३ जानेवारीला देणार पुरावे!

“जम्मू काश्मीर अन् बाळासाहेबांचं भावनिक नातं”

“मी काल भारत जोडो यात्रेत सहभागी झालो होतो. हा अतिषय सुंदर अनुभव होता. खरं तर मी यात्रेला राजकीय यात्रा मानत नाही. या देशतील जवळपास सर्वच राजकीय पक्षाचे नेते या यात्रेत सहभागी झाले होते. महाराष्ट्रात यात्रा आली तेव्हा आदित्य ठाकरेही सहभागी झाले होते. जम्मू काश्मीर आणि बाळासाहेब ठाकरेंचं नेहमीच एक भावनिक नातं राहिलं आहे. त्यानुसार मी उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार या यात्रेत सहभागी झालो होतो”, अशी प्रतिक्रियाही संजय राऊत यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 12:54 IST

संबंधित बातम्या