Sanjay Raut on Abhijit Dipke NEET Paper Leak Protest: सध्या देशभरात चर्चा आहे ती NEET पेपरफुटीप्रकरणी अभिजीत दिपकेंनी स्थापन केलेल्या CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक या मागणीसाठी गेल्या २१ दिवसांपासून बेमुदत उपोषण करत असून दिल्लीच्या जंतरमंतरवर काल सीजेपीच्या आंदोलकांचा मोठा गोंधळ दिसून आला. आंदोलकांनी संसदेवर काढलेल्या मोर्चावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यात अनेक आंदोलक गंभीर जखमी झाल्याचं दिसून आलं. या सर्व पार्श्वभूमीवर एकीकडे या लाठीचार्जची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी करतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी थेट अभिजीत दिपकेंचा उल्लेख करत मांडलेली भूमिका चर्चेत आली आहे.

अभिजीत दिपकेंबाबत काय म्हणाले संजय राऊत?

सोमवारी जंतरमंतर आणि त्यानंतर संसद भवनाच्या परिसरात झालेल्या आंदोलनात विरोधी पक्ष कुठेच दिसला नसल्याचा प्रश्न राऊतांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना विरोधी पक्ष या आंदोलनाच्या पाठिशी आहे म्हणून हे आंदोलन यशस्वी होत असल्याचा दावा संजय राऊतांनी केला.

“आंदोलनासाठी आलेले लोक हे कोणत्याही एका व्यक्तीच्या मागे नाहीत. मग सोनम वांगचुक असोत किंवा अभिजित दिपके असोत. हा मुद्दा राहुल गांधी, आम्ही सगळ्यांनी उचलला. त्यातून ही लढाई सुरू झाली. त्या लढाईत तेल ओतण्याचं काम देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं. प्रत्येक राजकीय पक्ष नीट पेपरफुटीवर रस्त्यावर उतरला आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“आमच्यामुळेच आंदोलन यशस्वी”

दरम्यान, विरोधकांमुळेच आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा संजय राऊतांनी यावेळी केला. “अमेरिकेतून कुणी आलं म्हणून आंदोलनं होत नाहीत. आम्ही सगळे त्या आंदोलनाच्या पाठिशी आहोत म्हणून ते आंदोलन यशस्वी होत आहे. काल अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे नेते, भीम आर्मीचे नेते, आमचे लोक आंदोलनात होते. आम्ही सातत्याने त्या आंदोलनाच्या पाठिशी आहोत. काल उद्धव ठाकरेंनी किमान २५ वेळा यावर त्यांच्याशी चर्चा केली आहे”, असं ते म्हणाले.

२० जुलै हा डरपोक दिवस म्हणून साजरा करा – राऊत

यावेळी बोलताना संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकास्र सोडलं. “देशाच्या युवा शक्तीने आपला संताप ज्या पद्धतीने व्यक्त केला, त्याला आम्ही लोकशाही मानतो. नरेंद्र मोदी, अमित शाहांच्या पोलिसांनी त्या मुलांवर ज्या प्रकारे लाठीहल्ला केला, आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली. यांना मुलंबाळं नसल्यामुळे किंवा असले तरी परदेशात असल्यामुळे त्यांना आमच्या भारतातल्या मुलांचं दु:ख कळणार नाही. कालचा दिवस हा भारतीय लोकशाहीतला काळा दिवस होता. २० जुलै हा दिवस यापुढे डरपोक दिवस म्हणून साजरा करावा”, असं ते म्हणाले.

“आता विरोधी पक्षांनी हे आंदोलन ताब्यात घ्यायला हवं. आम्ही जिथे संधी मिळेल तिथे आंदोलनाला समर्थन देत आहेत. आता हे आंदोलन देशपातळीवर घेऊन जावं लागेल”, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.