राज्यातील महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर गेली अनेक दिवस प्रतीक्षा असलेल्या शिवसेना व मनसेच्या राजकीय युतीची अधिकृत घोषणा उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे हे आज संयुक्त पत्रकार परिषदेत करणार आहेत. शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी याबद्दलची घोषणा केली आहे. मुंबईसह पाच महापालिकांत शिवसेना (ठाकरे) – मनसे युतीची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र जागावाटपावर निश्चित होत नसल्याने घोषणा लांबणीवर पडली होती.
दरम्यान राऊतांनी जागावाटपाबद्दलची चर्चा संपल्याचे स्पष्ट केले आहे. “मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नाशिक, पुणे महानगरपालिकेबाबत आमची जागा वाटपासंबंधीची चर्चा संपली आहे. याशिवाय इतर महानगरपालिका जेथे-जेथे शक्य आहे तिथे आम्ही एकत्र महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी काम करत आहोत,” असे संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊत नेमंक काय म्हणाले?
दरम्यान मराठी माणसासाठी ठाकरे बंधू एकत्र आले, पण या निवडणुकीत तुमच्या विरोधात लढणारे आणि त्यांना मतदान करणारे देखील मराठीत आहेत, याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर संजय राऊत म्हणाले की, “हा एक महाराष्ट्राला मिळालेला शाप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठी माणसानेच स्वराज्याला विरोधा केला. शिवाजी महाराजांनी ज्या सव्वा दोनशे लढाया लढल्या, असं शिवसेनाप्रमुख नेहमी सांगायचे, त्यातील किमान दोनशे लढाया ते स्वकियांविरोधात लढले. तरी त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले.”
“बाळासाहेब ठाकरेंना सर्वात जास्त विरोध काही मराठी लोकांनी केला. तरीही त्यांच्यावर मात करून बाळासाहेबांनी शिवसेना निर्माण केली आणि राजकारणात यशस्वी कली. हे प्रत्येक राज्यात होत असतं. आपलेच लोक आपल्या विरोधात उभे राहतात. त्यांना स्वाभिमान नको आहे,” असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या नगराध्यक्षांच्या मेळाव्यावरही टीका केली आहे. थेट नाव न घेता संजय राऊत म्हणाले की, “…जे दिल्लीचे बुटचाटे आहे, त्यांनी परवा मेळावा देखील घेतला होता. ते प्रॅक्टिस करत आहेत, चांगल्याप्रकारे दिल्लीचे बूट कसे पुसता येतील याची रंगीत तालिम सुरू आहे. पण महाराष्ट्रातील तळागाळातील मराठी आणि मध्यममवर्गीय माणूस हा ठामपणे या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागे उभा राहिल याविषयी आमच्या मनात शंका नाही, असेही राऊत म्हणाले.
