काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत भाषण करताना विविध मुद्य्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर शाब्दिक हल्ला चढवला. यामध्ये प्रामुख्याने अदाणी, महागाई, बेरोजगारी या मुद्य्यांचा समावेश होता.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणात महागाई आणि बेरोजगारी हे दोन शब्दही नव्हते याला काय म्हणायचं असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत विचारला आहे. याशिवाय, ऑस्ट्रेलियात पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले तिथेही त्यांनी अदाणींचा फायदा करून दिला. अदाणींसाठी विमानतळांचा नियम बदलण्यात आला त्यावर आम्ही लवकरच पुरावे सादर करू असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा पूर्ण करून आलेल्या राहुल गांधींच्या आजच्या भाषणावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनीदेखील पुन्हा एकदा राहुल गांधी यांची स्तुती केली आहे.
“सत्य बोलणे हे एक क्रांतिकारी काम आहे. राहुल गांधी यांनी आज लोकसभेत ते काम केलं. एक धमाकेदार भाषण. जय हिंद.” असं संजय राऊत ट्वीटद्वारे म्हणाले आहेत. याशिवाय त्यांनी प्रियंका गांधी यांचे ट्वीटही जोडले आहे ज्यामध्ये राहुल गांधीच्या आजच्या लोकसभेतील भाषणाची लिंक दिलेली आहे.
या अगोदरही संजय राऊतांकडून राहुल गांधींची स्तुती –
“राहुल गांधी एका तपस्वी व्यक्तीप्रमाणे प्रवास करत असल्याचं लोकांची भावना आहे. त्या भावनेला तडा देण्याचं काम काही लोकं करत आहेत. कपडे, चपलांवरून वाद निर्माण करणारे देशात द्वेष पसरवत आहेत. त्यापार्श्वभूमीवरच राहुल गांधी प्रेमाचा संदेश घेऊन श्रीनगरपर्यंत निघाले आहेत.” असं संजय राऊत राहुल गांधीची भारत जोडो यात्रा सुरू असताना म्हणाले होते.
याशिवाय, “सत्ताधाऱ्यांनी धसका घ्यावा अशीच महायात्रा आहे. राजकीय फायदे तोटे पाहत नाही. पण, राहुल गांधींचे नेतृत्व यात्रेमुळे उजळून निघालं आहे. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला उजाळा मिळाला आहे. त्याचा फायदा देशातील लोकशाहीला मजबूत करण्यासाठी होऊ शकतो. राहुल गांधींनी यात्रा यशस्वी करून दाखवली.” असंही संजय राऊतांनी सांगितलं होतं.