Sanjay Raut Rajya Sabha Speech: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावर बोलताना गृहमंत्री अमित शाह कुठे आहेत? याबाबत प्रश्न उपस्थित केला. “मी लापता गृहमंत्री असा एक चित्रपट बनवणार आहे”, अशी टीका राऊतांनी शाहांवर केली. “महाराष्ट्रात पेपरफुटी प्रकरणातील सर्व लोक भाजपाचे सदस्य आहेत”, असे वक्तव्यही राऊतांनी यावेळी सभागृहात बोलताना केले.
कवी पाश यांच्या कवितेने भाषणाला सुरुवात
संजय राऊतांनी राज्यसभेत बोलताना कवी पाश यांच्या कवितेच्या ओळी, सबसे ख़तरनाक होता है हमारे सपनों का मर जाना… म्हणत भाषणाला सुरुवात केली. “भारतातील लोकांचे स्वप्न मारली गेल्यात किंवा मृत झाल्यात. २० जुलै रोजी या स्वप्नांवर लाठीचार्ज झाला, अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, लाकडांना खिळे लावून हल्ला करण्यात आला. आणि शेवटी पॅलेट गन चालवून लोकांची स्वप्न संपविण्याचे काम केले”, असे संजय राऊत म्हणाले. पण, “विद्यार्थी आंदोलनातून आलेल्या अनेक सत्ताधाऱ्यांना याबाबत संवेदना व्यक्त करण्याची इच्छा झाली नाही”, अशी टीका राऊतांनी केली.
गृहमंत्र्यांवर टीका
राऊतांनी आणीबाणीचा संदर्भ देत त्यावेळी देखील विद्यार्थी आंदोलन झाले होते असे सांगितले. “यावेळी झालेल्या विद्यार्थी आंदोलनातून विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार दूर करण्याची मागणी केली. पण, पंतप्रधान घाबरले, गृहमंत्री घाबरले, ते बेपत्ता आहेत. आम्ही शोधतोय. मी तर एक चित्रपट बनवणार आहे लापता गृहमंत्री. एवढं मोठं आंदोलन झाले, लाठीचार्ज झाला, पॅलेट गन चालवण्यात आल्या तरी एक वक्तव्य केलं नाही”, असे राऊत म्हणाले.
महाराष्ट्रातील पेपरफुटीचा संदर्भ
पेपरफुटी कशी होते हे मी तुम्हाला सांगतो म्हणत संजय राऊतांनी महाराष्ट्राचा संदर्भ दिला. “मी तृम्हाला महाराष्ट्राची गोष्ट सांगतो. पेपरफुटी कशी होते सांगतो. पेपर फुटीप्रकरणी सर्वाधिक लोक महाराष्ट्रातून पकडले गेले आहेत. ८ लोकांना अटक झाली आहे. पेपरफुटी प्रकरणातील सर्व लोक भाजपाचे सदस्य आहेत. हे मला दुर्देवाने सांगावे लागत आहे. नीट परीक्षा ही विद्यार्थ्यांचं भविष्य घडवत असते. परंतु ही व्यवस्था सिस्टिम फेल्युअर झाल्याने कोलमडत असेल तर मुलांच्या भविष्यासाठी मोठा धोका आहे”, असे राऊत राज्यसभेत बोलताना म्हणाले.
