माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. २ नोव्हेंबरला त्यांना पुणे येथील रूबी हॉल क्लिनिक या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना बुधवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर शरद पवार मुंबईत आले आहेत. मुंबईत आल्यानंतर त्यांना बुधवारी संध्याकाळी पुन्हा ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी शरद पवारांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याबाबत आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विठ्ठल मणियार यांनी माध्यमांना काय सांगितलं होतं?

“सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साहेबांच्या प्रकृतीसंदर्भात फोन केला होता. त्यांनी अत्यंत आदरपूर्वक शरद पवार यांची चौकशी केली. प्रकृतीबाबत विचारपूस केली. नरेंद्र मोदी आज शरद पवार यांना म्हणाले की सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू तुम्ही प्रकृती सांभाळा, विश्रांती घ्या. असं नरेंद्र मोदी शरद पवार यांना म्हणाले आहेत. विश्रांती घेण्याची विनंती आहे असं मोदींनी शरद पवार यांना सांगितलं. ज्यावर शरद पवार यांनी होय मी विश्रांती घेतो आहे. आपण सगळे असल्यानंतर मला देशाची चिंता नाही असं सांगितलं. तसंच नरेंद्र मोदींचे शरद पवार यांनी आभारही मानले फोन केल्याबद्दल.” असं विठ्ठल मणियार यांनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदींनी शरद पवारांना जो फोन केला त्याबाबत काय म्हणाले संजय राऊत?

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत, बोलू नये तरीही सांगतो मोदी हे खोटारडे गृहस्थ आहेत. शरद पवार आजारी आहेत फोन केला. लालूप्रसाद यादवही आजारी आहेत. या देशातल्या सर्व प्रमुख नेत्यांना जे विरोधी पक्षात होते त्या सगळ्यांची चौकशी केली पाहिजे. मोदी सोयीची चौकशी करतात. मग सुप्रिया सुळेंचा उल्लेख करून संभ्रम निर्माण करणंही त्यांनी केलं. आजारपणाच्या चौकशीतही जे राजकारण करतात त्यांच्याबाबत काय बोलायचं? पण मी हे सांगतो की मोदींनी कितीही फासे टाकले तरीही शरद पवार आणि त्यांचा पक्ष मोदींच्या भुलथापांना बळी पडणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची फोनवरून विचारपूस केली आणि सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू तुमचे आशीर्वाद असू द्या असं म्हटलं आहे. त्यामुळे शरद पवार NDA मध्ये सहभागी होणार का? याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या. ज्याबाबत आता संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसंच मोदींनी कितीही फासे टाकले तरीही काही उपयोग होणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.