राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं असून यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. मेजर ध्यानचंद यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतानाचा फोटो ट्विट करत मोदींनी ही माहिती दिली आहे. त्यानंतर आता या मुद्द्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.

“मेजर ध्यानचंद हे महान खेळाडू आहेत. ते हॉकीचे जादूगार होते. सरकारने त्यांच नाव दिलं आहे. पण वारंवार एखाद्या योजनेची नावं बदलणं आणि त्यातून काय मिळवायचं आहे हे सरकारला माहिती आहे. ध्यानचंद यांच्या नावाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यावर टीका टिपणी होऊ नये,” असं संजय राऊत यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटलं आहे.

मोटेरा स्टेडियमला पंतप्रधानांच नाव देण्यात आलं आहे असे विचारले असता, “ही त्यांची भूमिका आहे. भाजपाने ठरवलं असेल एखाद्याचं नाव द्यावं किंवा बदलावं त्यांचं सरकार आहे, बहुमतातलं सरकार आहे,” अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

“आपल्याला जी पदकं मिळतायत ते काय एखाद्या राजकीय पक्षाचं यश नाही. हे निवडणुकांचं यश नाही. हे त्या खेळाडूने, त्या त्या राज्याने केलेली मेहनत आहे. अनेक वर्षापासून त्यांच्यामागे यंत्रणा काम करते. त्या सर्वांच्या मेहनतीमधून ती पदकं आपल्याला मिळतायतं,” असे राऊत यांनी म्हटले.