पेट्रोल आणि वाढलेल्या डिझेलच्या किमतींमुळे हैराण झालेल्या लोकांना दिवाळीपूर्वी केंद्र सरकार तसेच काही राज्य सरकारांकडून मोठी भेट मिळाली आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये आणि डिझेलवर १० रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे इंधनदराच्या भडक्यामुळे त्रासलेल्या नागरिकांना केंद्र सरकारने बुधवारी काही प्रमाणात दिलासा दिला आहे. केंद्राने इंधनावरील केलेली कपात आज गुरुवारपासून लागू झाली आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

“मन मोठं असण्यासाठी आधी मन असावे लागते. आम्हाला पाच रुपयांची नोट दाखवत आहात. किमान २५ रुपये इंधन कपात कराला हवी होती आणि त्यानंतर ५० रुपये. १०० रुपये वाढवायचे आणि पाच रुपये कमी करायचे हे कसलं मोठं मन? मग दरवाढ केली हे सुद्धा मन मोठे असण्याचे लक्षण आहे का? ज्यांचे मन कठोर आहे तेच पेट्रोल डिझेलचे दर वाढवू शकतात. पेट्रोल पंपावर लोक मोदींकडे बघतात मग मोदी त्यांना आम्हाला मत दिल्याची किंमत चुकवा असा आशिर्वाद देतात. २०२४ साली हेही दिवस जातील,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“आता इतक्या दिवसांनी जाग आलीच आहे तर..” इंधनदर कपातीनंतर रोहित पवारांचा केंद्राला सल्ला

महाराष्ट्र सरकार पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणार का यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “या संदर्भात चर्चा सुरु आहे. महाराष्ट्र सरकारने लोकांच्या महागाई संदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. पण केंद्र सरकार या सर्व गोष्टींना जबाबदार आहे. पेट्रोल डिझेलच्या भाववाढीतून केंद्र सरकारने बेहिशेबी पैसे कमावले आणि आता फक्त पाच रुपये कमी करत आहात. २५-३० रुपये कमी केले असते तर भाजपावाले सांगतात तसे मोठे मन दिसलं असते,” असे संजय राऊत म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांच्या टीकेवरही संजय राऊत यांनी उत्तर दिले.  “यासाठी केंद्राकडेच बोट दाखवावे लागेल. पेट्रोल डिझेलचे भाव राज्य सरकार वाढवत नाही. भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडे बोट दाखवले तर त्यांची बोटे छाटणार का तुम्ही. देशासंदर्भात धोरणात्मक निर्णय तुम्हीच घेता मग बोट कुणाकडे अमेरिकेकडे, बायडेन यांच्याकडे दाखवायचे?” असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, इंधन दरवाढीमुळे इतर वस्तूंचीही भाववाढ झाल्याने ऐन सणासुदीत ग्राहकांना महागाईस सामोरे जावे लागत आहे. त्यावरून काँग्रेससह विरोधकांनी केंद्रातील भाजप सरकारला सातत्याने लक्ष्य केले. लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत काही ठिकाणी सत्ताधारी भाजपाला पराभवाचा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर अखेर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पेट्रोलदरात पाच रुपयांची, तर डिझेलदरात दहा रुपयांची कपात होईल.