तमिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला खात्री आहे की काल देशाचे सर्वोच्च नेतृत्व सुद्धा गोंधळले असेल असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“रशियन बनावटचे अत्याधुनिक ते हेलिकॉप्टर होते. बिपिन रावत यांच्यावर देशाने सैन्याच्या आधुनिकीकरणाच्या जबाबदाऱ्या टाकल्या होत्या त्या संदर्भात ते काम करत होते. चीन आणि पाकिस्तान संदर्भात केलेल्या कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता. बिपिन रावत यांचा अत्यंत सुरक्षित वाहनातून जाताना अपघात होता तेव्हा देशाच्या मनामध्ये नक्कीच शंका निर्माण होते. सरकार त्या संदर्भात चौकशी करेलच. पण लोकांच्या मनातील शंकाचे निरसण करण्याची जबाबदारी पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांची आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“बिपिन रावत यांच्या जाण्याने सरकार सुद्धा गोंधळलेले आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये बिपिन रावत हे त्यांचा लष्करी रुबाब बाजूला ठेवून आमच्यासोबत संवाद साधत असत. मला खात्री आहे की काल देशाचे सर्वोच्च नेतृत्व सुद्धा गोंधळले असेल. या घटनेमुळे त्यांच्या मनात सुद्धा काही शंका निर्माण झाल्या असतील,” असे संजय राऊत म्हणाले.

“हेलिकॉप्टर अपघातानंतरही सीडीएस रावत जिवंत होते, त्यांनी हळू आवाजात नाव सांगितले”; अग्निशमन कर्मचाऱ्याचा दावा

“बिपिन रावत यांना मी फार जवळून पाहिले आहे. आमच्या समितीसमोर माहिती देण्यासाठी आल्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत संवाद साधला आहे. सीमेवरच्या सामान्य सैनिकापर्यंत त्यांचा संवाद होता. अनेकदा त्यांनी अत्यंत किचकट विषय संरक्षण समितीसमोर अगदी सोप्या शब्दात समजून सांगितले. त्यामुळे गोंधळ आणि शंका दूर झाल्या. सर्व शंकाचे बिपिन रावत यांनी अनेकदा सोप्या शब्दात निरसन करण्याचे काम केले,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जनरल बिपीन रावत हे ‘एमआय-१७ व्ही५’ हेलिकॉप्टरने तमिळनाडूतील वेलिंग्टन येथील संरक्षण दलाच्या महाविद्यालयातील (डीएसएससी) कार्यक्रमासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह १४ जण होते. कोईम्बतूरजवळील सुलूर हवाई तळावरून सकाळी ११.४८ वाजता उड्डाण घेतलेले हे हेलिकॉप्टर पाऊण तासात वेलिंग्टन येथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच (१२.२२ वाजता)  ते निलगिरी   जिल्ह्यातील कट्टेरी-नांचपंचथ्राम येथे कोसळले.

स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून प्रशासनाला या दुर्घटनेची माहिती दिली. हेलिकॉप्टरला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न स्थानिकांनी केला. दुर्घटनेआधी हेलिकॉप्टर कमी उंचीवरून जात होते. जमिनीवर कोसळेपर्यंत हेलिकॉप्टरने पेट घेतला होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कोसळत्या हेलिकॉप्टरमधून आगीने पेट घेतलेल्या अवस्थेत दोघांना खाली पडताना पाहिल्याचे पेरूमल या स्थानिक प्रत्यक्षदर्शीने सांगितले.