“देशाचा प्रत्येक नागरिक शेतकऱ्याबरोबर”; कृषी कायद्याविरोधातील भारत बंदबाबत संजय राऊत यांची प्रतिक्रिया

सरकारच्या कृपेमुळे लोकं बेरोजगार असल्याने घरीच आहेत असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे

Sanjay Raut reaction to the Bharat Bandh against the Agriculture Act
शिवसेना खासदार संजय राऊत

केंद्राच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या (एसकेएम) ‘भारत बंद’ ला सुरुवात झाली आहे. या बंदला राजकीय पक्षांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. शेतकरी सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत रस्ते अडवून निषेध करणार आहेत. काँग्रेस, डावे पक्ष, राजद, बसपा आणि सपासह देशातील जवळपास प्रत्येक विरोधी पक्षाने आधीच शेतकरी भारत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 “तीन काळे कृषी कायद्यांविरोधात हा बंद पुकारला आहे. राकेश टिकैत यांनी परवा मोदी आणि बायडेन यांच्या भेटीदरम्यान ट्विट करुन आमच्याकडे लक्ष देण्याची मागणी केली होती. आजच्या भारत बंदला लोकांचा पूर्ण पाठिंबा आहे. आज लॉकडाऊन सुरु आहे. सरकारच्या कृपेमुळे उद्योगधंदे बंद पडले आहेत. लोकं बेरोजगार असल्याने घरीच आहेत. या देशाचा प्रत्येक नागरिक हा शेतकऱ्याबरोबर आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तीन नवीन कृषी कायद्यांना एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदचा मोठा परिणाम दिसून येत आहे. यामुळे दिल्लीच्या सीमेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे, तर अनेक शहरांमध्ये रेल्वे गाड्याही ठप्प झाल्या आहेत. दिल्लीला उत्तर प्रदेशला जोडणारी गाझीपूर सीमा शेतकरी आंदोलकांनी रोखली आहे.

केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गेल्या वर्षी २७ सप्टेंबरला मंजुरी दिली होती. त्यास एक वर्ष पूर्ण होत असताना हा ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. सकाळी ६ पासून दुपारी ४ वाजेपर्यंत पाळल्या जाणाऱ्या बंददरम्यान देशभरातील सर्व सरकारी व खासगी कार्यालये, शैक्षणिक व इतर संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहतील, तसेच सार्वजनिक कार्यक्रम होणार नाहीत. रुग्णालये, औषधांची दुकाने यांच्यासह सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sanjay raut reaction to the bharat bandh against the agriculture act abn