राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण अल्याचं दिसून आले. सर्व सामान्य कार्यकर्त्यापासून ते राजकीय जाणकारांपर्यंत अनेकजण या भेटीबद्दल अंदाज वर्तवू लागले. जवळपास एक तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून या भेटी मागचे नेमके कारण सांगण्यात आले. तर आता या भेटीबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, यावेळी संजय राऊत यांनी भाजपाच्या मनात काही दुःख आहे, वेदना आहेत ते त्यांना आमच्याकडे मोकळं केलं पाहिजे, असं देखील बोलून दाखवलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, तासभर झाली चर्चा; तर्क-वितर्कांना उधाण!

“या भेटीबाबत आश्चर्य वाटावं, धक्कादायक असं काय आहे? शरद पवार हे देशाचे माजी कृषीमंत्री, संरक्षणमंत्री आहेत. सहाकार क्षेत्रातील दिग्गज असं ते नेतृत्व आहे. अशा एखाद्या प्रश्नासाठी शरद पवार हे त्यांना भेटले असतील. मलाही कल्पना होती, आम्हाला सगळ्यांना कल्पना होती की सध्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्रात जे सुरू आहे. काही सूडाच्या कारवाया त्या संदर्भात लवकरच शरद पवार हे पंतप्रधान मोदींना भेटून जी काही तथ्य आहेत, या क्षेत्रातील त्या सांगण्याची शक्यता आहे असं मलाही वाटत होतं आणि त्यांनी सांगणं गरजेचं सुद्धा होतं. आता नक्की त्यासाठीच भेट घेतली का हे शरद पवारच सांगू शकतील. पण शरद पवार हे राज्यसभेचे सदस्य आहेत. आता खासदार जाऊन पंतप्रधांनाना भेटू शकत नाही का? आमदार भेटतात मुख्यमंत्र्यांना, नगरसेवक भेटतात महापौरांना, आम्ही खासदार पंतप्रधानांना भेटतो, केंद्रीय मंत्र्यांना भेटतो. शरद पवार हे टोलेजंग नेते आहेत.” असं संजय राऊत एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत.

“…म्हणून शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट”, जयंत पाटील यांनी सांगितलं भेटीचं कारण!

राज्यातील सरकारवर परिणाम होणार नाही –

तसेच, “या भेटीबाबात विश्वासात घेण्याचा प्रश्न येतो कुठे? संसद सदस्य पंतप्रधानाना भेटू शकत नाही का? आम्ही भेटतो ना, सध्या भारतात मीडियाचे काही प्रश्न आहेत. आता अनेकांचं असं मागणं आहे की, एक शिष्टमंडळ जाऊन आपण पंतप्रधानांना भेटूयात. मी पण वेळ मागितील आहे त्यांची मीडियाच्या काही विषया संदर्भात. पंतप्रधानांना भेटून आपले प्रश्न मांडणं हे आमचं काम आहे. शरद पवार नक्कीच एक राजकारणातले, सहकार, कृषी क्षेत्रातील महत्वाचे नेते आहेत आणि पंतप्रधान व शरद पवार यांचे संबंध हे काय आजचे नाही, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. जसं उद्धव ठाकरे व पंतप्रधान मोदी यांचे संबंध आजचे आहेत का? नाही ते जुने आहेत. तसेच शरद पवार व पंतप्रधान मोदी यांचे संबंध फार जुने आहेत. या भेटींवरून होणाऱ्या राजकीय चर्चांना काही अर्थ नाही. या सर्व निरर्थक चर्चा आहेत. शरद पवार व मोदींची भेट झाली किंवा उद्धव ठाकरे व मोदींची भेट झाली तर त्याचे परिणाम राज्यातील सरकारवर होणार नाही.” असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

दिल्लीत शरद पवारांच्या गाठीभेटींबाबत नवाब मलिक यांनी दिली माहिती, म्हणाले…

भाजपाच्या मनात काही दुःख आहे, वेदना आहेत –

याचबरोबर “परवा छगन भुजबळ व देवेंद्र फडणवीस भेटले, मग फडणवीस दिल्लीत आले. येऊ द्या भेटू द्या, एकमेकांना भेटू नये का? एकमेकांना भेटण्यावर काही बंधनं आणली आहेत का सरकारने? नाही. आम्ही एकमेकांना भेटत असतो. भेटलं पाहिजे, बोलले पाहिजे मन मोकळं केलं पाहिजे. भाजपाच्या मनात काही दुःख आहे. वेदना आहेत, ते त्यांना आमच्याकडे मोकळं केलं पाहिजे, तेव्हा त्यांना बर वाटेल. असं आतल्या आत घुसमटून चालणार नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो, बोलतो त्यांना धीर देतो. तीन वर्षे सबुरीची आहेत ती काढा तुम्ही मग आपण निवडणुकांना सामोरं जावू, उगाच वाकडी-तिकडी पावलं टाकू नका, असं आम्ही नेहमी सांगत असतो. मग ते शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासारखे मोठे नेते असतील तर तेही तेच सांगत असतील. काही होणार नाही, भिंतीवर डोकं आपटण्यासारखं आहे हे सरकार अजिबात पडणार नाही, तडे जाणार नाहीत. हे सरकार चालवण्या संदर्भात पाच वर्षांची कमिटमेंट आहे आणि ती कमिटमेंट पूर्ण होणार. आमच्या टायरमध्ये हवा आहे, ट्यूब मजबूत आहे. गाडीला ब्रेक देखील आहे. कधी लावयाचा कुठं लावायचा हे देखील माहिती आहे. ही काय उगाच उताराला लागलेली गाडी नाही. ” असा टोला देखील संजय राऊत यांनी यावेळी भाजपाला लगावला

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut reacts to the meeting between prime minister modi and sharad pawar msr
First published on: 17-07-2021 at 18:12 IST