नवी दिल्ली: माझ्या वा माझ्या पत्नीच्या खात्यात एक रुपया जरी गैरमार्गाने आला असेल तर मी संपूर्ण संपत्ती भाजपच्या नावे करून देईन.. जे घडते ते चांगल्यासाठीच! महाराष्ट्र आणि मराठी लोकांविरोधात कोण आणि काय करत आहे हे आता उघड झाले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘ईडी’च्या कारवाईनंतर व्यक्त केली.

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी राऊत यांच्या मालकीचे अलिबागमधील ८ भूखंड तसेच, दादरमधील सदनिका सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी जप्त केली. ‘‘जमिनीचा एक तुकडा आणि राहते घर याला कोणी संपत्ती म्हणत असेल तर, संपत्तीची व्याख्या बदलावी लागेल.. ईडीच्या कारवायांपुढे मी वा शिवसेना वाकणार नाही, घाबरणार नाही. जप्त केलेल्या घरातच काही महिन्यांपूर्वी भाजपच्या नेत्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी दबाव आणला होता. तुम्हाला खूप संकटांना सामोरे जावे लागेल अशा धमक्या दिल्या होत्या. पण, त्यांना मी बधलो नाही. मी कधीही गुडघे टेकणार नाही. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे,’’ असे राऊत म्हणाले.

२००९ मध्ये मी अलिबागची जमीन खरेदी केली होती, त्यासंदर्भात २०२२ मध्ये कारवाई झाली आहे. राजकीय सूड आणि बदला घेण्यासाठी भाजप कोणत्या थराला जात आहे हे लोकांना दिसत आहे.. मराठी माणसाचे राहते घर जप्त केले म्हणून भाजपवाल्यांना आनंद होत आहे, ते फटाके फोडत आहेत. पण, त्यांच्या अशा वागण्यातून आम्हाला (शिवसेना) त्यांच्याविरोधात लढण्याची प्रेरणा मिळते, असेही राऊत म्हणाले. भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात मी केलेल्या आरोपांवर राज्य सरकारने विशेष तपास पथक नेमले. त्यानंतर लगेच माझ्याविरोधात ‘ईडी’ने कारवाई केली. म्हणूनच मी ‘असत्यमेव जयते’ असे ट्वीट केले, असे राऊत म्हणाले.

भाजप नेते किरीट सोमय्या व संजय राऊत यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. ‘ईडी’च्या कारवाईनंतर सोमय्यांनी मुंबईत तातडीने पत्रकार परिषद घेतली. त्यावर, ‘किरीट सोमय्या हे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत. मराठीविरोधात न्यायालयात जाणारा माणूस आम्हाला अक्कल शिकवणार काय’, अशी टीका राऊत यांनी केली.

ठाकरे-पवार यांच्याशी चर्चा

‘ईडी’च्या जप्तीनंतर संजय राऊत यांनी लगेचच फोनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही दिल्लीतील निवासस्थानी संपर्क साधला. ‘‘ही कारवाई म्हणजे आम्ही (भाजपविरोधात) करत असलेल्या लढाईतील घाव आहे.. या देशात सत्य कायम राहील, कायद्याला इतक्या सहजपणे संपवता येणार नाही. भाजपला या चुकांची किंमत कधी न कधी द्यावी लागेल’’, असे राऊत म्हणाले.