मोदी-शाह पर्वाचा अस्त जवळ आला आहे, तसंच भाजपाचे चार दिग्गज ज्यांना स्तंभ म्हणता येईल असे नेते वेगळा विचार करत आहेत असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसंच भाजपाचं सरकार आता बंदुकीच्या बळावर चाललं आहे. या सरकारची वाचा निघून गेली आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

एप्रिल महिन्यात देशात राजकीय परिवर्तन होणार-संजय राऊत

मार्च ते एप्रिल ते या महिन्यात या देशात राजकीय परिवर्तन होईल. कारण खदखद ही फक्त विरोधी पक्षांमध्येच नाही तर भाजपातही आहे. आणीबाणीच्या आधी किंवा आणीबाणीच्या नंतर जनता पक्ष स्थापन होण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा जगजीवन राम, बहुगुणा असे नेते पक्ष सोडून गेले. भाजपामध्ये आता तशीच दुफळी माजली आहे. इतक्या मोठ्या मोदी विरोधी आंदोलनात कुठलाही भाजपाचा नेता मोदी किंवा शाह यांची बाजू घेऊन उभा राहिलेला नाही. भाजपातील मोदी आणि शाह यांच्या पर्वाचा अस्त जवळ आला आहे. अनेक नेते मोदी आणि शाह यांच्यापासून वेगळे होतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

भारतातला राज्यकारभार सैन्याचा वापर करून केला जातो आहे-राऊत

भारतातलं सध्याचा जो राज्यकारभार आहे तो सैन्य दलाचा वापर करून टिकवण्याचा मोदी आणि शाह यांचा प्रयत्न चालला आहे. शनिवारी हे चित्र आपण पाहिलं. पोलिसांनी थांबवलं, कडं उभारलं तरीही दिल्ली आणि मुंबईत आंदोलन झालं. महात्मा गांधींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला एक दिशा दिली होती, त्यांच्यामुळे चले जाव आंदोलन यशस्वी झालं होतं. त्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महानायक महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधींना अटक करण्यात आली पोलिसांना लाज वाटली पाहिजे असंही संजय राऊत म्हणाले. भारतातल्या हुकुमशाहीविरोधात किंवा नव्या ब्रिटिश राजवटीबद्दल ते आवाज उठवत असतील तर त्यांची चूक काय? असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे.

भाजपातले चार नेते वेगळ्या मनस्थितीत आहेत-राऊत

भाजपातले चार प्रमुख नेते या क्षणी वेगळ्या मनस्थितीत आहेत. भाजपाचे जे स्तंभ आहेत किंवा विचारधारांचे असे हे चार नेते आहेत. ते चारही नेते वेगळ्या विचारांमध्ये आहेत. इंदिरा गांधींच्या सरकारला सर्वात मोठा धोका हा जगजीवन राम यांच्या पक्ष सोडण्यातून निर्माण झाला होता. भाजपाची वाटचाल आता त्याच दिशेने सुरू आहे. मोदींचं सरकार हे सहा ते सात महिन्यांमध्ये तुम्हाला दिसणार नाही. आत्ताच मोदी सरकारची वाचा गेली आहे. आत्ताचं सरकार बंदुकीच्या बळावर, शस्त्राच्या बळावर आणि दडपशाहीच्या ताकदीवर चाललं आहे असंही संजय राऊत म्हणाले.